दारू विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीचीच होते पोलिसात तक्रार - महात्मा गांधी तंटामुक्त समिती वैरागडचे अध्यक्ष हिरामण मुगीकोल्हे

वैरागड :- गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी, मोहफुलाची दारू अनेक गावांत खुलेआम विकली जाते. याविरुद्ध बोलणाऱ्यावर अवैध व्यावसायिक नियोजितपणे खोटे आरोप लावून पोलिसांकडे तक्रारी करतात. असे घडत असल्यास समाजातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलणारे पुढे कसे येतील, असे मत महात्मा गांधी तंटामुक्त समिती वैरागडचे अध्यक्ष हिरामण मुगीकोल्हे यांनी व्यक्त केले.

गाव तंटामुक्त समितीला प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वैरागड येथील समाज भवनात नवीन कार्यकारिणीची पहिली सभा संपन्न झाली. यावेळी सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी संगीता मेश्राम, महादेव दुमाने, जगदीश पेंदराम, वैशाली कांबळे, पितांबर लांजेवार, मुखर्जी खोब्रागडे, बालाजी पोपडी, पांडुरंग बावनकर, श्रीराम आहीरकर, परसराम कुंमरे, डोनू कांबळे, प्रदीप बोडणे, लक्ष्मण लाडे, जनार्दन बर्डे, आदेशा आकरे, जास्वंदा कोटांगले, परसराम कुमरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी समितीकडे झालेल्या तक्रारीवर विचारविनिमय करून, योग्य न्यायनिवाडा करण्यात आला. प्रास्ताविक पोलीस पाटील गोरख भानारकर यांनी केले, तर आभार समितीचे सदस्य नेताजी बोडणे यांनी मानले. सुज्ञ व्यक्तीने पोलिसांकडे दारूविक्रीबाबत तक्रार केली असल्यास त्यानुसार पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी सभेत करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post