“माझ्याकडे महागड्या कार आहेत, मी गोल्फ खेळतो, मला मोठे स्तन असणाऱ्या महिलांशी खेळायला आवडते आणि शनिवार- रविवारी मी सुट्टीचा आनंद घेतो”,एका वाक्याने २२ वर्षांचं करिअर संपलं, Apple च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजीनामा

Apple कंपनीच्या पुरवठा साखळीचे उपाध्यक्ष टोनी ब्लेव्हिन्स यांच्या कथित व्हायरल व्हिडीओनंतर त्यांनी आयफोन निर्माती कंपनी ऍपलच्या नोकरीचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. ब्लेव्हिन्स मागील २२ वर्षांपासून ऍपलमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी एका महिलेसह ब्लेव्हिन्स यांचा कारमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर त्यांनी आता आपल्या २२ वर्षीय करिअरला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लेव्हिन्स यांचा व्हायरल व्हिडीओ नेमका काय होता व हे संपूर्ण प्रकरण कसं समोर आलं हे आपण जाणून घेऊयात..

ब्लूमबर्गने सर्वात आधी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या सुरुवातीला टिकटॉकवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ब्लेव्हिन्स एका महिलेसोबत कारमध्ये दिसत आहेत. या महिलेने त्यांना तुम्ही काय काम करता हा प्रश्न केला होता ज्यावर उत्तर देताना “माझ्याकडे महागड्या कार आहेत, मी गोल्फ खेळतो, मला मोठे स्तन असणाऱ्या महिलांशी खेळायला आवडते आणि शनिवार- रविवारी मी सुट्टीचा आनंद घेतो”, असे ब्लेव्हिन्स यांनी सांगितले

टिकटॉकर डॅनियल मॅक यांनी एका कार शोमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी बोलावले होते. मॅक जेव्हा ब्लेव्हिन्स यांना कामाविषयी विचारतात त्यावेळी ब्लेव्हिन्स यांनी हे विचित्र व धक्कादायक उत्तर दिले आहे. मॅक यांनी ब्लेव्हिन्स यांना तुम्ही नेमकं काय काम करता ज्यामुळे एवढ्या महाग गाड्या तुमच्याकडे आहेत? असा प्रश्न केला होता ज्यावर ब्लेव्हिन्स यांनी १९८१ च्या ‘आर्थर’ सिनेमातील एका वाक्यावरून उत्तर दिल्याचं ब्लूमबर्गने सांगितले आहे.

दरम्यान, ब्लेव्हिन्स यांच्या व्हिडिओवर किंवा त्यांच्या राजीनाम्यावर ऍपलकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. ऍपलचे उपाध्यक्ष ब्लेव्हिन्स यांची कंपनीच्या पुरवठा साखळी कार्यात महत्वाची भूमिका होती. ऍपलच्या उत्पादनांसाठी पुरवठादार निवडणे व त्यांचे काम तपासणे अशी जबाबदारी ब्लेव्हिन्स यांच्यावर होती. वॉल स्ट्रीट जर्नलमधील ब्लेव्हिन्सच्या २०२० प्रोफाइलमध्ये त्यांना आयफोन निर्माती कंपनी “ब्लीव्हिनेटर” म्हणून संबोधत असल्याचे सांगण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post