मी दारू विक्री बंद करतो पण.... माझ्या लग्न करून द्या आणि घर बांधून द्या...

अर्जुनी मोरगाव :- गावात शांतता व सुव्यवस्था रहावी, या दृष्टीकोणातून झरपडा येथील नागरिकांनी अवैध दारू विक्रेत्यांना दारू विक्री बंद करण्याचे विनंती केली. परंतु चक्क एका दारू विक्रेत्याने विनंती करण्यासाठी आलेल्या पुढाऱ्यांना माझे लग्न करून द्या तसेच घर बांधुन द्या, तेव्हा दारू विक्री बंद करतो, असा उलट सवाल केला, यामुळे दारूबंदीसाठी सरसावलेले गावातील सुज्ञ नागरिकच चक्रावले. तर दुसरीकडे अवैध दारू विक्रेत्याने या सवालाच्या माध्यमातून शासन, प्रशासनापुढे बेरोजगारीचा प्रश्नही उपस्थित केला आहे. असे असले तरी गावात दारुबंदीसाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची विनंती गावकऱ्यांनी केली आहे.

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधदारू विक्री धंदा सुरू आहे. हा अवैध धंद्यात काही लोक जाणून सहभागी झाले आहेत तर काही लोकांना बेरोजगारीने ओढले आहे. एवढेच नव्हेतर अनेक अवैध व्यवसायीक रोजगाराचे काहीच साधन नसल्यामुळे हा व्यवसाय नाईलाजास्तव करीत आहेत. याचे प्रत्येय झरपडा येथील एका अवैध दारू विक्रेत्यांने दारू बंदीसाठी सरसावलेल्या पुढाऱ्यांपुढे उलट सवाल उपस्थित करून आणून दिले आहे.


सविस्तर असे की, झरपडा येथे सणाच्या दिवसात गावात शांतता व सुव्यवस्था रहावी, यासाठी गावातील नागरिक प्रयत्न करीत असतात. त्यातच गावात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भिम ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमात कसलेही व्यत्येय येवू नये किंबहुना शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये, यासाठी तंमुस अध्यक्ष मंगल लांजेवार यांच्यासह काही सुज्ञ नागरिक गावात दारुबंदीसाठी सरसावले. दरम्यान दारुबंदीसाठी पुढाकार घेतलेल्या नागरिकांनी गावात दारुविक्री करणाऱ्यांशी संपर्क साधले. त्यातच अवैधरित्या दारूविक्री करू नये, अशी विनंती केली.


या विनंतीवर काही दारु विक्रेत्यांनी पुढाऱ्यांनाच सुनावले. तर एका विक्रेत्याने चक्क दारू बंदीसाठी सरसावलेल्या पुढाऱ्यांना 'माझे लग्न करून द्या' तसेच ' माझे घर बांधून द्या' तेव्हा मी लगेच दारू विक्रीचा धंदा बंद करतो, असा सवाल उपस्थित करून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण केला. अवैध दारू विक्रेत्याचा उलट सवाल ऐकून विनंतीसाठी गेलेले गावातील पुढारी चांगलेच चक्रावले. 

असे असले तरी गावात दारूबंदीसाठी पोलिसांनी सहकार्य करावे, अशी विनंती झरपडावासीयांनी केली. तर दुसरीकडे दारु विक्रेत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून शासन प्रशासनापुढेही बेरोजगारी मांडली आहे. अवैध व्यवसायात गुंतलेले काही व्यवसायीक बेरोजगारीमुळे आहेत, ही बाब देखील त्याने उपस्थित करून दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post