वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करून बदनामी करण्याची तसेच खुनाची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी महिलेसह ६ तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल


पुणे (प्रतिनिधी ) : वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करून बदनामी करण्याची तसेच खुनाची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी महिलेसह ६ तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांना मुंढवा पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्षमणसिंग तंवर अशी अटक केलेल्या तोतया पत्रकारांची नावे आहेत. योगेश नागपुरे आणि संजीवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २३ ऑक्टोबरला केशवनगरमधील दत्त कॉलनीमधील एका गोदामात घडला. याप्रकरणी ४२ वर्षाच्या तेजाराम भिमाजी देवासी या व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे केशवनगर येथील दत्त कॉलनीत गोदाम आहे. आरोपी प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद २३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या गोदामात गेले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर हे थांबले होते. प्रमोद साळुंखेने फिर्यादीला पत्रकार असल्याचे सांगितले. तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याचा साठा आहे. यापूर्वी गुटख्याची विक्री करुन खूप पैसा कमावला आहे. बातमी प्रसिद्ध करून तुमची बदनामी करतो. तुम्हाला पूर्णपणे बरबाद करुन टाकतो. जर पैसे दिले नाही तर जीवे मारून टाकतो' अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करताच मुंढवा पोलिसांनी चौघा तोतया पत्रकारांना अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक काकडे, सहायक पोलीस निरीक्षक करपे, नाना भांदुर्गे, हेमंत झुरुंगे, राहुल मोरे, राजू, कदम, योगेश गायकवाड, वैभव मोरे यांनी केली.







Post a Comment

Previous Post Next Post