चालताना अचानक खिशात असलेल्या मोबाईलने घेतला पेट, पायाला झाली जबर दुखापत…

भंडारा:- आज मोबाईल की काळाची गरज बनली आहे. मोबाईल शिवाय बाहेर पडणे आता कठीण झाले आहे. असे असताना आपण नेहमी आपला मोबाईल आपल्या जवळच ठेवत असतो. नेहमी आपल्या खिशात ठेवतो. मात्र, नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जे जाणून तुमचा थरकाप उडेल.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामधील सौंदळ पुनर्वसन येथे राहणारे 25 वर्षीय अंकित विश्वनाथ भुते हे गावात असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जात होते. त्यांनी आपला मोबाईल आपल्या खिशात ठेवला होता. ते चालत असताना अचानक खिशात असलेल्या मोबाईलने पेट घेतला.

हा सगळा प्रकार गावकऱ्यांनी पाहताच त्यांनी लगेच अंकितकडे धाव घेतली आणि त्यांच्या खिशातील मोबाईल बाहेर काढला. या घटनेत अंकित यांचा पाय भाजला असून जबर जखम झाली आहे. त्यांना लगेच अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी पायावर उपचार करून त्यांना आता घरी पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणानंतर मोबाइल एक्सपर्ट यांनी सांगितले आहे की, मोबाईल मध्ये लिथियम आणि पॉलिमर असते आणि हे द्रव्य जास्त चार्जिंग केल्याने अधिक गरम होते. यामुळे बॅटरी फुगते आणि त्याचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते.

Post a Comment

Previous Post Next Post