वीज दुरुस्ती करताना शॉक लागून लाईनमनचा मृत्यू

 
पोंभूर्णा: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून शेतातील एका खांबावर लाइन दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाइनमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना पोंभुर्णा उपपोलीस स्टेशन हद्दीतील चेक हत्तीबोडी येथे शनिवारी दुपारी १२ वाजता घडली. दीपक बाळा पेंदाम (३२) असे मृतकाचे नाव असून, तो मूळचा सावली तालुक्यातील खेडी येथील रहिवासी आहे. तो पोंभुर्णा येथील वीज वितरण कंपनीत विद्युत सहायक पदावर कार्यरत होता. चेक हत्तीबोडी येथील वीज दुरुस्ती करण्यासाठी दीपक पेंदाम हा डीपीवरील वीजपुरवठा बंद असल्याची खात्री करून खांबावर चढला. दुरूस्ती करताना विजेचा प्रवाह सुरू झाल्याने धक्का लागून मृत्यू झाला.








काही काळ तणावाचे वातावरण



मृतकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व तत्काळ नोकरी देण्यात यावी, यासाठी नातेवाईक, राजकीय पदाधिकारी व गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळल्याने तणाव शांत झाला. यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तेलंग यांनी नातेवाइकांनी केलेल्या मागण्या लेख स्वरुपात मान्य केल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, पोंभुर्णा ठाणेदार धर्मेंद्र जोशी, उमरीचे ठाणेदार किशोर शेरकी, कार्यकारी अभियंता तेलंग, माजी सभापती अलका आत्राम, माजी सभापती विजय कोरेवार, नगरसेवक दर्शन गोरंटीवार, रुपेश निमसरकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post