महात्मा फुले आणि_बळीराजा


       बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या कथेविषयीचं, आपलं आकलन मात्र वाढलं नाही, असंच खेदाने म्हणावं लागतं. 
             वर्षानुवर्ष तीच कथा आपण सांगत आलो किंवा ऐकत आलो. त्यात काडीचाही बदल नाही. एवढी वैचारिक स्थितीप्रियता, आमच्या अंगी आली आहे. विचारच करायचा नाही असा प्रण केल्यावर, वय वाढलं तरी बुद्धीत वाढ कशी होणार! परिणामी हजारवेळा ऐकूनही त्या कथेतल्या विसंगती, आपल्याला कळल्या नाहीत.
             असो! आपण डोळ्यावर कातडं ओढलं, म्हणून सगळ्या जगाने डोळ्यावर कातडं ओढलं, असं होत नाही. जगात काही शहाणी माणसंसुद्धा असतात. ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात. त्यामुळे त्यांना सत्याचा साक्षात्कार होतो. महात्मा जोतिबा फुले हे असेच सत्यशोधक सुधारक. सत्यशोधकीय दृष्टिमुळे बळीराजाच्या कथेतल्या विसंगती त्यांच्या सहज लक्षात आल्या. 
             बळी राजा अतिशय दानशूर होता - तो मातल्यामुळे त्याला मारण्यासाठी विष्णूने वामनाचा अवतार घेतला - वामनाने बळी राजाकडे तीन पावलं जमीन दान मागितली - बळी राजा त्यास तयार झाला - तितक्यात वामनाने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं - एक पाय पृथ्वीवर, दुसरा स्वर्गावर ठेऊन तिसरा पाय कोठे ठेवू असं त्याने बळी राजाला विचारलं - बळी राजाने तो आपल्या डोक्यावर ठेवण्यास सांगितला - वामनाने बळी राजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडला. अशी बळी राजाची कथा. ही कथा वाचल्यावर काही प्रश्नांचं मनात काहूर दाटतं.
* एक - बळीराजा दानशूर होता की मातलेला? 
* दोन - तो मातलेला असता, तर त्याने वामनाला दान
   दिले असते का? 
* तीन - तिसरा पाय स्वत:च्या डोक्यावर ठेवायला
  सांगणारा माणूस, मातलेला कसा असेल? 
* चार - बळी राजा जर दानशूर होता, तर मग 
  त्याच्याकडे दान मागण्यासाठी विष्णूने, छद्मरुप का
  धारण केले? 
* पाच - बळी राजाने दानास नकार दिला नव्हता, तरीही
   त्याला पाताळात का गाडले? हा वामनाचा कृतघ्नपणा
   नाही का? 
* सहा - बळी राजा जर दुष्ट होता, तर मग बहुजन माता
   भगिनी वर्षानुवर्षे, 'इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो'
   अशी प्रार्थना का करत आल्या?
               या सर्व प्रश्नांनी महात्मा फुले अस्वस्थ झाले. विचारांती त्यांच्या ध्यानात आले की, बळी राजा आणि वामन, हा समतावादी व उत्पादक अब्राह्मणी संस्कृती आणि विषमतावादी, अनुत्पादक व वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी संस्कृती, यातील सांस्कृतिक वर्चस्वासाठीचा संघर्ष आहे. अशारितीने बळी-वामनाच्या मिथकाचा त्यांना उलगडा झाला. त्यातून प्राचीन भारताच्या इतिहास संशोधनाला नवा दृष्टिकोन, नवी दिशा मिळाली. व भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीला सुरवात झाली.
             आमच्या माता-भगिनींनी पिढ्यानपिढ्या 'इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो!' या आपल्या हृदयात जपून ठेवलेल्या प्रेमाच्या एका रेशीम धाग्याच्या सहाय्याने, महात्मा फुलेंनी 'पाताळ' गाठून पाताळात गाडलेला संविभागी सिंधु सम्राट बळी राजा आणि त्याचा खरा इतिहास जनतेपुढे आणला. व 'सुतावरुन स्वर्ग गाठणा-या' मनुवादी इतिहासाच्या पायालाच सुरुंग लावला. त्याची परिणती बळी राजा हा भारतीय कृषि संस्कृति व समतेचं सर्वोच्च प्रतीक आणि अभिमानबिंदू झाला. बळी राज्याची संकल्पना सर्वमान्य झाली. बलीप्रतिपदेला 'बळी राजा गौरव दिन' हा नवा आयाम मिळाला तर 'बळीराज्य' हे आपलं सर्वोच्च ध्येय बनलं. आणि -
                             इडा पीडा टळो !
                           बळीचं राज्य येवो !
             हा बळीराज्याच्या स्वप्नपूर्तिचा महामंत्र बनला. या स्वप्नपूर्तीसाठी बलीप्रतिपदेला सर्वत्र बळी राजा गौरव मिरवणुका निघत आहेत. याचं सर्व श्रेय महात्मा फुलेंना! 
             महात्मा फुले आणि आपल्या कृषिसंस्कृतीचा सिंधुसम्राट बळीराजा या दोन्ही महानायकांच्या पवित्र स्मृतिंना सादर अभिवादन!
© Subhashchandra Sonar
रविवार :                                   
 दि. २७.१०.२०१९ : राजगुरुनगर.
                                ***
000000000000000000000000000000000000000

Post a Comment

Previous Post Next Post