म्हातारा नसे तितुका,अवघे पाऊणशे वयमान.

म्हातारा नसे तितुका,अवघे पाऊणशे वयमान.


  शारदेचे लग्न झाले.सर्व गांव नाचले,कुदले,जेवले.पण कोणीही विचारले नाही कि, नवरदेवाचे वय किती?नवरीचे वय किती? तरीही एक चाणाक्षाचे लक्ष गेलेच.

हातामधे काठी,कमरेची कमान !
म्हातारा नसे तितुका,अवघे पाऊणशे वयमान!!
दत्ताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान!
थिजले बुजले डोळे,अवघे पाऊणशे वयमान!!
लोंबकळले हात,पाय करीती कंपन !
नन्ना म्हणते मान,अवघे पाऊणशे वयमान !!

          मलिकार्जून खर्गें कांग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक झाली.मुंबईत गुलाल उधळला.विजयाचा आनंद मनवला.तेंव्हा मला शारदेचे लग्न आठवले.कांग्रेसचे ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्याशी लग्न.तरीही फटाके फोडलेत.आता हा नवरदेव फटाके फोडणार कि नाही, याबाबत कोणीही विचार केला नाही.
      खर्गे आजोबा,हे चाळीस वर्षांपासून कांग्रेस मधे आहेत.अनेक पदांवर बसले,बसवले , आम्ही पाहात आहोत.पण बाबांनी कधीही पेरणी केलेली आढळत नाही.विचारांची पेरणी.कांग्रेसची भुमी ओसाड ,विरान,पडित झाली आहे.तेथे काही उगतच नाही.त्यामुळे कोणी पेरण्याचा प्रयत्न करीतच नाही.आता आजोबांना कांग्रेस कसायला दिली आहे.लोकांनी अंदाज बांधलेत.आजोबा अध्यक्ष झालेत म्हणजे नेमके काय घडले?फक्त आजोबांना वरच्या खुर्चीवर बसवले.बसा! दाखवा गावाला,कि आमची खुर्ची रिकामी नाही.आजोबांना शेतात झोपडी बांधून दिली,खाट टाकून दिली.बसा येथे.आहे कोणीतरी शेतात,असे दिसले पाहिजे.
         आजोबा चाळीस वर्षात अनेक पदावर बसलेत. आम्ही आजोबांना लोकसभेत पाहिले,विरोधी पक्ष नेता म्हणून.तेथेही असतांना कोणतीही पेरणी केली नाही.विचारांची पेरणी.तरीही आजोबांना अध्यक्ष बनवले.जर कोणतेही राजकीय विचार डोक्यात नसतील तर पेरतील तरी काय? बीजवाई नसेल तर शेती कसतील कशी? शेतकरी उदास,शेती ओसाड.
      राजकिय पक्ष म्हणजे,मी अध्यक्ष,तू उपाध्यक्ष,हा सचिव ,असा समज कांग्रेस चा झाला आहे.ही पदे आहेत.जर काम होत नसेल,कोणी करीतच नसेल तर पदे तरी काय कामाची ? बीजवाई नसेल,पेरायचेच नसेल तर बैल तरी काय कामाचे? असा प्रश्न कांग्रेसला पडतच नाही.म्हणूनच कांग्रेस चे बैल भाजपने खरेदी केलेत,काही पळवलेत,काही भाड्याने घेतलेत.मध्य प्रदेश,गोवा, गुजरात,कर्नाटक.
      राजकिय पक्ष हा जनतेचे नेतृत्व करतो.जनतेचे प्रश्न सोडवतो.त्या दिशेने विचार करतो,पाऊले टाकतो, समर्थन मागतो.पण येथे जनतेचे प्रश्नच माहितच नाहीत.कोणी सांगितले तरी ते ऐकून घेत नाहीत.मग नेता म्हणावे कसे? मागील अडिच वर्षे कांग्रेस चे महारथी महाआघाडी सरकार मधे मंत्री होते.मंत्री म्हणजे खूप काही असते.गाडी,बंगला,फौज फाटा म्हणजे मंत्री नव्हे.हा फक्त शिणगार असतो.हे फक्त लावण्य असते.खरी कसब स्टेजवर असते.ती कसब एकाही मंत्रीने दाखवली नाही.अशोकराव चव्हाण,एके काळचे मुख्यमंत्री.ते सार्वजनिक बांधकाममंत्री होते.काय बांधकाम केले?ज्याला आम्ही सार्वजनिक हिताचे म्हणावे? महाराष्ट्रातील सर्वच रस्ते उखडून भग्न झालेत.सरकार उखडून फेकले तोपर्यंत चव्हाणांनी उखडलेल्या रस्त्यांकडे लक्ष दिले नाही.मी जळगाव चा माणूस आहे.जळगांव मधील रस्ते चालण्याच्या लायकीचे नाहीत.तुमच्या कोणाकडे असतील तर सांगा.आम्ही येतो फिरायला.बाळासाहेब,थोरात हे नऊ वेळा आमदार आणि अनेक वेळा मंत्री झालेले.यांच्याकडे महत्वाचे खाते होते.महसूल.यांनी कवडीचे काम केले नाही.फक्त लोंबकळते,हलते,डुलते शरीर सांभाळत बसले.कांग्रेस कडे शिक्षण,उर्जा खाती होती.मंत्री म्हणून कोणतेही लक्षवेधी काम केले नाही.शाळा ओसाड,गुरूजी सैराट.बोगस शिक्षक भरती वर्षा गायकवाड च्या लक्षातच आली नाही. नितीन राऊतांचे कायमचे लोड शेडींग आणि मीटर फॉल्टी.नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष होते.कोणतेही उल्लेखनीय काम केले नाही. म्हणे येथे रस निघत नाही,एखादे खातेपिते खाते हवे.म्हणून विधानसभा अध्यक्ष पद सोडले.ते हरवले,पुन्हा हाती पडलेच नाही.कांग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदावर अशी माणसे बसवून ठेवली ,कि त्यांना सांगावे लागते कि,मी जिल्हा अध्यक्ष आहे.विश्वास बसत म्हणून नियुक्ती पत्र खिशात घालून फिरतात.टपरीवर ,अड्यावर,बस मधे दाखवतात,हे बघा ,मी जिल्हा अध्यक्ष आहे.ही दयानिय अवस्था आहे.तुम्ही काय केले ?असे विचारले तर सांगतात,माझे आजोबा,माझे वडील कांग्रेस मधे होते .आम्ही नानांकडे समक्ष भेटून आक्षेप घेतला तर म्हणे हे वरून येते.वरून म्हणजे कोठून? ढगातून कि स्वर्गातून?तसे वरून येत असेल तर तुम्ही अध्यक्ष असून काय उपयोग? कांग्रेस चे तीन मुख्यमंत्री हयात असताना कांग्रेस मृतवत झाली आहे.अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज बाबा चव्हाण, सुशिलकुमार शिंदे.हे माजी मुख्यमंत्री असून नसल्यासारखे आहेत.मुख्यमंत्री हा तेरा कोटी लोकांचा नेता असतो.हे ते विसरलेच.
       भाजप च्या एकहाती सत्तेमुळे जनता त्रस्त झाली आहे.हुकुमशाहीची चाहूल लागली आहे.शेजारचे चीनमधे शी जिनपींग आणि रशियामधे पुतीन यांनी तहियात खुर्ची बळकावली आहे.तिच हवा नरेंद्र मोदींच्या डोक्यात आली आहे. हम करे सो कायदा,हम कहे सो वायदा.इव्हीएमची जादूगिरी,सरकारी संस्थांची विक्री,आपीसी ३५३ची दादागिरी,इडीची एकतरफी शिकार,आमदारांची खरीदारी,आणि आता निवडणुक आयोग व सर्वोच्च न्यायालय सुद्धा. ही हुकुमशाही कडे जाणारी पायरी आहेत.रशिया,चीन ,भारत एकाच रेखांशवरील देश आहेत.हुकूमशाहीत देश महासत्ता बनतो,असा यांचा ठाम समज आहे.
     प्रजेला घरकूल दिले.राशन दिले.गैस दिला.चूल दिली.संडास दिला.शिवथाळी दिली.दिवाळी दिली.ही वाटचाल लाचारी वाढवण्याकडे आहे.अशा लाचार प्रजेवर हुकुमत गाजवणे राजाला सोपे असते.लाचार माणसाच्या डोक्यात विचार येत नाहीत.उद्या कुठे,कोणती भीक मागायची?इतकेच.
        नातवंडे आजोबांच्या लग्नात नाचत होती.ते दृष्य मुंबईत कांग्रेस भवन मधे दिसले.आम्हीच आमचे श्राद्ध करीत आहोत,असे मला वाटले.

..... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post