अन् तो मेलेला तरुण अचानक जिवंत झाला...

अकोला :
२५ वर्षे वयाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली. गावकऱ्यांची गर्दी जमली होती. तरुणाचे पार्थिव तिरडीवर ठेवण्यात आले व अंत्ययात्रा स्मशानाच्या दिशेने रवाना झाली... रस्त्यावरच तिरडीवरील तरुण जिवंत झाला. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. देवी चमत्कारामुळे तरुण पुन्हा जिवंत झाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये पसरली. या प्रकरणात पोलिसांचा हस्तक्षेप होऊन चौकशी सुरु झाली. त्यावेळी हे प्रकरणच वेगळे असल्याचे लक्षात आले... आता पोलिस या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलेले आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात ही विचित्र घटना घडली असून या घटनेबद्धल आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रशांत मेसरे (वय २५) असे त्या तरुणाचे नाव. २६ आक्टोबर ला सायंकाळी ही विचित्र घटना उघडकीस आली.. प्रशांत हा होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. तो आजारी झाल्यावर त्याच्यावर बुलडाणा येथील चिखली येथे उपचार सुरु होते, असे सांगितले जाते. तो मृत झाल्याचे समजून त्याला अकोला जिल्ह्यातील विवरा गावात आणले गेले. तेथे त्याच्या अंत्यविधीची तयारीही झाली. गावकरी मोठ्या संख्येने जमले होते. अंत्ययात्रा स्मशानाकडे निघाल्यावर प्रशांत मार्गातच तिरडीवरून उठला. गावातील लोकांनी सांगितले की, एक मंत्रिक या अंत्ययात्रे आडवा आला व त्याने प्रशांतला जिवंत करतो असा दावा केला होता. प्रशांतला एका खोलीत आल्यावर काही वेळाने मांत्रिक व प्रशांत असे दोघेही खोलीतून बाहेर आले, असा घटनाक्रम गावकरी सांगत आहेत. या घटनेनंतर गावात दैवी चमत्कारातून तरुण जिवंत झाल्याची चर्चा पसरली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यावर वेगळीच माहिती चौकशीतून बाहेर पडली. या घटनेत मांत्रिक आणि प्रशांत या दोघांचा बनाव असल्याचे लक्षात आले. मात्र, या दोघांनी हा बनाव का केला, याची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेतील अनेक गोष्टी उघड व्हायच्या आहेत असे पोलिसांकडून सांगण्यात आले.....

Post a Comment

Previous Post Next Post