फवारणी करताना विषबाधा होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू


विरुर स्टेशन : शेतात कपाशीच्या पिकावर कीटकनाशक औषधी फवारणी करण्यासाठी गेलेल्या बंडू हिरामण टेकाम (४५) रा. सुब्बई या शेतमजुराचा विषबाधा होऊन दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. राजुरा तालुक्यातील येत असलेल्या सुब्बई येथील बंडू हिरामण टेकाम हा रोजंदारीने शंकर अंगलवार यांच्या शेतामध्ये १५ ऑक्टोबरला कपाशीच्या पिकावरील फवारणीचे मोनोक्रोटोफास, लान्सर गोल्ड हे कीटकनाशक औषध फवारणी करण्यासाठी गेला होता. फवारणी झाल्यानंतर सायंकाळी घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्यामुळे घरच्यांनी उपचाराकरिता १६ ऑक्टोबरला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले, परंतु त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post