वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ


संक्षिप्त : वामनाने बळीच्या मस्तकावर पाय दिला अन् त्याला पाताळात घातले. वामनाची तीन पावले म्हणजे बहुजन समाजाच्या विविध क्षमतांचा घात करणारी तीन धारदार शस्त्र होती. या संदर्भात दुःखद बाब अशी की सिंधुजन (बहुजन) समाजाला वामनाची ती पावले पूजनीय वाटली. आपल्या मस्तकावर धारण करण्या इतपत पवित्र भासली. बळी हा काही आपल्यापुढे केवळ एक राजा म्हणून वा एक व्यक्ती म्हणून उभा नव्हता. तर तो या देशातील सर्व बहुजन समाजाचा एक महान प्रतिनिधी होता.
——————————
वामनाने तीन पावलां इतकी भूमी मागण्याची क्लृप्ती योजून बळीचा पराभव केला, असे विविध ग्रंथांनी नोंदवून ठेवले आहे, वामनाने खरोखर अशा प्रकारची पावले टाकल्याची समजूत बऱ्याच वेळा झाल्याची दिसते; पुराणांनी वेगवेगळ्या कथा रचून वामनाने जणू खरोखरच तीन पावले टाकली असे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. वामनाने पहिल्या पावलाने लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले, दुसरे पाऊल वेदप्रामाण्याचे होते आणि तिसरे पाऊल बहुजनांची वाणी कुंठीत करून टाकणारे होते. तात्पर्य असे की यज्ञाने भूमी व्यापणे, वेदाने लोकांची बुद्धी गुलाम करणे आणि वाणीवर अधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे.
● यज्ञसंस्कृती हे वामनाने पाहिले पाऊल
यज्ञयाग करणे निरर्थक आहे, असे असुर मानत होते. वैज्ञानिक दृष्ट्या पाहता, त्यांचे हे मत बरोबरच होते. यज्ञ केल्यामुळे स्वर्ग वैगरे मिळतो, असा जो कार्यकारण संबंध सांगितला जातो, तो पूर्णपणे चुकीचाच आहे. यज्ञ हे कर्म निरर्थक असते, हे खरेच आहे. पण ते पुण्य देणारे, अर्थपूर्ण काम आहे, असे बहुजन समाजाला भासवून त्यांना त्यांच्या कर्मकांडात गुंतवून ठेवायचे आणि त्यांची सर्व प्रकारची सर्जनशीलता मारून टाकायची, यासाठी वैदिकांनी यज्ञाचा एक कार्यक्षम हत्यार म्हणून वापर केला, हे भारतीय सांस्कृतिक इतिहासाकडे पाहिले असता सहजच ध्यानात येते. शिवाय त्यांनी आपल्या जनसमुहाची एकजूट निर्माण करण्यासाठी आणि बहुजन समाजाविरुद्ध कारस्थाने करण्यासाठी देखील यज्ञाचा उपयोग केला. हे सर्व पाहिले असता, यज्ञ हे बहुजन समाजाची गती कुंठीत करणारे आणि त्यांच्या मनोभूमीला अंधाराने व्यापून टाकणारे वामनाचे पाहिले पाऊल होते.
● वेद हे वामनाने दुसरे पाऊल
वैदिकांनी वेदांचा वापर बहुजनांना कोंडून ठेवण्यासाठी केलेला कोंडवाडा या स्वरूपात केला. ज्यांना कोंडवाड्यात कोंडले जाते, त्यांना धड स्व ईच्छेने जगता येत नाही अन् धड बाहेरही पडता येत नाही. त्यांना येथे स्वतःच्या मर्जीने कोणतीही हालचाल करता येत नाही. अगदी स्वतःविषयी काही निर्णय घेण्याचे देखील स्वतंत्र नसते म्हणूनच वेदांचा उच्चार करणे वा इतरांनी केलेला उच्चार ऐकणे, या कृत्यांच्याही गंभीर शिक्षा सांगण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याची किंचीतही अभिव्यक्ती हा देखील मोठा गुन्हा सांगितला जायचा. हे सगळे टाळण्यासाठी बाहेर पडावे, तर बाहेर जाण्यासाठी वाटा रोखलेल्या असायच्या. सगळे दरवाजे बंद. कितीही यातना भोगाव्या लागल्या, तरी येथे टाचा घासत, अंधारात चाचपडत आणि दुसऱ्यासाठी राबत राहिले पाहिजे. स्वतःच्या चेहऱ्यावर गुलामगिरीच्या काजलीचे थर चढवत, चढवत, मृतवत जगताना जगण्याचे सोंग करत तडफडत राहिले पाहिजे, अशी स्थिती आहे. वेदांचा बहुजनांवर परिणाम नेमका असाच होता. वामनाने वेदरुपी दुसऱ्या पावलाने बहुजनांची बुद्धी चिरडून टाकली यात शंका नाही.
● वाणी हे वामनाने तिसरे पाऊल
वामनाने तिसऱ्या पावलाने वाणी व्यापली, याचा अर्थ वाणीच्या सर्व अविष्कारांवर वैदिकांची मक्तेदारी प्रस्थापित केली. बोलण्याची क्षमता जीभ असूनही अधिकाराच्या अभावी बोलता येणार नाही, अशी बहुजन समाजाची व्यथा करून टाकली. बहुजन समाजाने ग्रंथ लिहिणे, वाचणे, आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी अध्यापन करणे यांसारखे सगळे अधिकार गमावले. वाणी गमावण्याचे परिणाम फक्त वाणी गमावणे इतपत मर्यादित नव्हते; वाणी गमावल्यामुळे विचार करण्याची प्रक्रिया देखील थंडावली. विकासाच्या सर्व संधी हरवल्या. आपल्या पूर्वजांचा उज्ज्वल इतिहास समजण्याच्या वाटा बंद झाल्या. भविष्यासाठी उमदी आणि देखणी स्वप्ने पाहण्याची शक्ती उरली नाही. वामनाने आपल्या तिसऱ्या पावलाने बहुजन समाजाच्या असंख्य क्षमता कुंठीत केल्या.
● सत्यमेव जयते
वामनाने बळीच्या मस्तकावर पाय दिला, वामनाची तिन्ही पावले बहुजन समाजाच्या विविध क्षमतांचा घात करणारी तीन धारदार शस्त्र होती. या संदर्भातील दुःखाची बाब अशी की, बहुजन समाजाला वामनाची ती पावले पूजनीय वाटली. आपल्या मस्तकावर धारण करण्या इतपत पवित्र भासली. बळी हा काही आपल्यापुढे केवळ एक राजा म्हणून वा एक व्यक्ती म्हणून उभा नव्हता तर तो या देशातील सर्व बहुजन समाजाचा एक महान प्रतिनिधी होता.
वामनाने बळीच्या मस्तकावर पाय दिला याचा अर्थ त्याने बहुजन समाजाचे मस्तक चिरडले, दाबून दडपून टाकले आणि पर्यायाने या देशातील वैदिक संस्कृती ने बहुजन समाजाचा आपली बुद्धी वापरण्याचा अधिकार ठेचला असा याचा अर्थ आहे. बहुजन समाजाच्या प्रतिभेचे आणि निर्णयक्षमतेचे अंकुर तिने खुडून टाकले. बहुजन समाजाचे मस्तक वैदिकाच्या पायाखाली गहाण ठेवण्यास भाग पाडले. समाजाच्या धडावर आज धड जरी स्वतःचे असतील तरी मुंडके ज्यात मेंदू नावाचा चेतक घटक आहे ते मात्र वैदिक संस्कृतीचेच आहे.
ज्या दिवशी बहुजन समाजाच्या मस्तका वरील प्रतिभेची वेळ स्वतंत्रपणे आकाशात झेप घेईल, आपल्या धडावर आपलेच मुंडके राहणार त्या दिवशी वामनाचे ते पाऊल बळीच्या मस्तकावरून बाजूला सरकेल, इडेने निर्माण केलेली पिडा टळेल आणि आपणा सर्वांना आनंदामध्ये भिजवून तल्लीन करणारे बळीचे राज्य येईल! प्राचीन पूर्व काळापासून याच आशेवर भारतीय उपखंडातील संपूर्ण सिंधुजन आणि शेतकरी समाज बलिप्रतिपदा दिनानिमित्त बळीराजाला अभिवादन करून आर्जव घालतात आणि इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो असा आशावाद व्यक्त करीत प्रार्थना करतात.
भारतीय इतिहासात वा साहित्य क्षेत्रात बळीराजावर एकही महाकाव्य नाही. बळीचे पुराणही नाही. नाटक, खंडकाव्येही नाहीत. बळी नेमका कधी व कोठे जन्माला आला याची कुठेही नोंद नाही. सर्वच स्मृती हरपल्या आणि करपल्या आहेत. ज्या काही आहेत त्या लोककथा, लोकगीते महाभारत, पुराणांतून आलेल्या भ्रष्ट आणि वैदीकीकरण झालेल्या कथा आहेत. बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात घालणाऱ्या वामनाच्या नांवे मात्र त्याचे महात्म्य सांगणारे संपुर्ण पुराण आहे, तरीसुद्धा या भारत देशात तो काही केल्या वंदनीय ठरला नाही. आणि त्या उलट बळीराजा एवढी अपार लोकप्रियता भारतीय जनमानसात कोणाचीही नाही हेच खरे वास्तव आहे.
आज आपण आपली संस्कृती जपत असतांना “पुर्वजांचा पराभव झाला होता” या मिथककथांत रमत सांस्कृतिक व्यूहरचना करीत असतो, समजतो, न्यूनगंड जोपासतो हे समूळ चुकीचे आहे. सांस्कृतिक वर्चस्ववादाला थारा न देता स्वमुळांचा शोध महत्वाचा बनून जातो तो यामुळेच. देवासुर युद्धे ही काल्पनिक भासली तरी ती एका सांस्कृतिक संघर्षाची प्रतीकरुपे आहेत. आजही तो संघर्ष वेगळ्या रुपाने अस्तित्वात आहे. बळीराजा संदर्भातील कथा मुळात कशा पद्धतीने विकसीत केल्या गेल्या हे पाहिले कि देव संस्कृती व असुर संस्कृतीतील युद्धे फक्त रणांगणात लढली गेली असे नाही तर साहित्यातून ही लढली गेली हे स्पष्ट होते.
युद्धात जय कोणाचाही होवो, लेखणीत जो जिंकतो तोच अजिंक्य ठरतो असे सर्व दिसून येते. पण यातही एक अमरत्वाचे दालन उघडलेले दिसून येते ते म्हणजे सत्य! म्हणून तर लेखणीने जरी घात केला असेल, विजय मिळविला असेल वा अजिंक्य ठरले असतील तरी अमरत्व मात्र बळीराजाच्याच वाट्याला आले हे नाकारता येत नाही.
- कुलस्वामी बळीराजा भाग सतरावा अठरावा
बलशालीभारत बळीगाथा लेखांक सतरावा अठरावा
लेखक : वीरेंद्र कडू
Email : virendrakadoo@gmail.com
मोबाईल क्रमांक : ९४०४२०२७४४
==================

Post a Comment

Previous Post Next Post