पळाले त्या आमदारांना गद्दार म्हणू नका!



   महाराष्ट्रातील पन्नास आमदारांनी विधासभा सोडून पळ काढला.तो थेट आसामच्या जंगलात.डोंगर,नद्या,झाडी तील गुवाहाटी ला.याबाबत उर्वरित सेनेने गद्दार म्हटले. जनतेनेही त्यांना गद्दार म्हटले.सेना सोडून जाणाऱ्या आमदार खासदार ला सेना गद्दार चे प्रमाणपत्र देते.पण यावेळी जनतेनेही गद्दार संबोधले.एकदा,दोनदा, अनेकदा.त्यामुळे ते पळून गेलेले आमदार चिडले.संतोष बांगर तर म्हणे कानफटीत मारीन.कधी पुन्हा म्हटले तर.तिकडे बिचारा संजय सिरसाट यांनी तर अंथरूण धरले.इकडे आमचे बच्चू कडू तर जास्त संतापले.सरळ फिर्याद नोंदवली राणा यांच्याविरोधात.असा प्रकार आम्ही हाफ चड्डीत असतांना करीत असू.फुल चड्डी घातल्यावर तसे करणे पोरकट वाटले.
       असे पळून गेलेल्या आमदारांना पुन्हा पुन्हा गद्दार म्हणू नका.ते चिडतील.त्यांची डोकी फिरली तर काहीही करू शकतात.इतरांचे किंवा स्वताचे जिवाचे बरे वाईटही करू शकतात.ते रात्री बेरात्री पळून गेलेत,याला काही कारणे आहेत.प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत.आमचे पारोळा एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील हे मंत्री गुलाबराव पाटील यांचा पिच्छा सुटावा म्हणून गुवाहाटी पळून गेलेत.पण भीतीपाठी ब्रम्हराक्षस.तसेच झाले.दोन दिवस उलटत नाहीत तोपर्यंत हे वेताळासारखे हजर.यांना पाहाताच आबांना घाम फुटला.आबा तसे सरळ माणूस.म्हणून आबांची खूप नाकेबंदी केली.मुस्कटदाबी केली.चोर तो चोर , वरून शिरजोर.आबांना वाटले ,आता तरी या माणसापासून आपण दूर राहू.पण आबांचे पळून जाणे व्यर्थ ठरले.
    आमदार बच्चू कडू.शेतकरी व अपंगांचे गळ्यातील ताईत.त्यांचेसाठी देवदूत.अंग्री एंग मॅन.यांना उद्धव ठाकरेंनी ध्यानीमनी नसताना मंत्री बनवले.पक्षाची तशी ताकद नसतांना मंत्रीपद मिळणे म्हणजे लॉटरी लागली हो!वाटले,एक इमानदार माणूस मंत्रीमंडळात बसला . सर्वच गौडबंगाल उघड करतील.पण नाही केले.काय कुठून अवदसा आठवली,बच्चू कडू अंधारात पळाले.थेट चमकले ते गुवाहाटी च्या रानात.इकडे चांगले मंत्री पद होते.कामधाम नको कि असेना पण मंत्री पद म्हणजे पर्वणी असते.सरकारी खजिन्याला भोक पाडून पैसा गोणीत भरता येतो.आणि कितीही गोणी भरून सांडणीवर ठेवल्या तरी कोणी हवालदार अडवत नाहीत.उलट डबल सैल्यूट ठोकतात, म्हणतात, साहेब,जाऊ द्या म्होरं.अडीच वर्षात दोन हजार कोटी चा मालक आमच्या मतदारसंघात आहेच.कल्पना करा,भोक किती मोठे असेल? अशा गोणी,सांडणी सोडून गुवाहाटी पळून जाणे मर्खपणा ठरला.तेल ही गेले,तुप ही गेले आणि हाती दुपाटणे आले.वरून हे रवि राणा ," पचास खोके,सबकुछ ओके" म्हणत असे चिडवत असतील तर राग तर येणारच!तरी तुम्ही विचारता कि,पिंटो को गुस्सा क्यूं आता है?मत पुछो,दिवानोपे क्या गुजरी है ? 
      इकडे पाचोरा चे आमदार किशोर पाटील यांनी गणपती पाण्यात टाकला होता.म्हणे आमच्या मतदारसंघातील बाबा प्रसन्न झाले.शिंदेंना आशिर्वाद दिला.म्हणे तुमचा मुख्यमंत्री होण्याचा योग आहे.पण लवकर करा‌.योग निघून गेल्यावर भोग मिळत नाही.अंगावरच्या कपड्यानिशी रिक्षातून पळाले.शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले कि आपली मंत्री पदी वर्णी लागतेच.पण दुर्भाग्य.त्यांनाही गुलाबराव नडले.माहिती असते कि,शिंदे आणि गुलाबराव यांची गट्टी आहे तर किशोर आप्पा आणि चिमण आबा यांनी सोडचिठ्ठी दिली असती.पण राजकीय बुद्धीबळाचे फासे यांना कळलेच नाहीत.दैवाचा डाव कुणा न कळला.मंत्री पद मिळेल या आशेने ठाकरे घराण्याशी दोन पिढ्यांची जवळीक आप्पांनी गमावली.मंत्री पद तर मिळालेच नाही पण आता आमदारकी ला वांदा झाला आहे.तेल ही गेले आणि तूप ही गेले तर लाटणे पाठीला येईल.आता तर बहिण वैशाली सुर्यवंशी यांची विधानसभेची तयारी चालू आहे‌.तिकडे अमोल शिंदे दबा धरून बसले आहेत.तोंडातील भाकरी पाण्यात दिसली.ती धरायला ही सोडली.देव करो,अशी गत न होवो.
     अशा अनेक आमदारांच्या भुतपुर्व मंत्र्यांच्या रहस्यमय कहाणी आहेत.एक एक करुन उघड होत आहेत.
      मला नाही वाटत कि हे इतके आमदार गद्दार असतील.यांचे असे कुठेतरी दगडाखाली हात असतील.जे आधीच मंत्री होते,ते तरी का गुवाहाटी पळाले असतील? त्यांचा हिशोब वेगळा होता.अडीच वर्षात सरकारी खजिना लुटला.आता इडी चा ससेमिरा मागे लागला तर जेलमध्ये जावे लागेल.या भीतीने पळालेत. 
इडीच्या बेडीतून सुटलेत. यांनी शिवसेनेशी गद्दारी नाही केली,जनतेशी केली.आता जनतेने यांना धडा शिकवला पाहिजे.आपला मंत्री चोर होता.म्हणून पळाला ना!आता त्याला पुन्हा आमदार निवडून द्यायचा नाही.त्या चोरांना गद्दार नका म्हणू.त्यांना काही केल्या पुन्हा आमदार निवडून नाही दिला तर पुन्हा कोणी गुवाहाटी पळून जाणार नाही.लोकशाहीत निवडणूक खूप मोठी पर्वणी असते.चोरवडला चुरड स्वतः जाते आणि म्हणते,सोड रे दत्त्या! दत्तात्रय महाराज म्हणतात,मी कुठे धरून ठेवले आहे तुला? तूच झिंझोट्या आपटून हैराण होत आहे.तसे या आमदारांना मोकळे सोडा.कितीही डोके आपटू द्या.कितीही पैसा खर्च करू द्या.पण लक्षच द्यायचे नाही.मत द्यायचे नाही . जेणेकरून पुन्हा आमदार होणारच नाही.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post