राजा रावण कविता

रावण जळत असताना रावणाने
हसून गर्दीकडे बघितलं
तपासा स्वतःच्या चारित्र्याला
मोठ्यानं त्यानं विचारलं.


केलाय मी गुन्हा
सीतेचं अपहरण करण्याचा
प्रयत्न नाही केला
मर्यादेची सीमा ओलांडण्याचा.

दिवसाढवळ्या रस्त्यावर
अब्रूचे लचके तोडतात
सभ्यपणाचा आव दाखवून
दरवर्षी मला जाळतात.

तुम्हा मानवां पेक्षा
राक्षस ठरलो भारी
केला नाही अपमान
सीतेचा माझ्या दारी.


हुंड्याच्या लालसेपोटी
तुम्ही हजारो सीता जाळल्या
वंशाच्या दिवट्या साठी
गर्भात कळ्या मारल्या

हक्क नाही तुम्हांला
मला बदनाम ठरवण्याचा
प्रयत्न करा तुम्हीं
स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा!

तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा
पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा !

👍🏻

Post a Comment

Previous Post Next Post