खेळाडुंनी खेळभावना जोपासली पाहिजे - मा. मनोजभाऊ वनमाळी, सचिव, म.शि.प्र.मंडळ, आरमोरी


महात्मा गांधी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा प्रारंभ

आरमोरी, दि. १८/१०/२०२२
 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बौद्धिक अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबर शारीरिक सुदृढ सुद्धा असायला पाहिजे. मनाच्या निकोप वाढीसाठी शारीरिक खेळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शारीरिक खेळात सहभाग घ्यावा, खेळात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खेळभावना जोपासून स्वच्छ मनाने सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. मनोजभाऊ वनमाळी यांनी केले. स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण, खेळ व क्रीडा विभागाद्वारे आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय बास्केटबॉल महिला व पुरूष क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. 
यावेळी मंचावर आरमोरीचे तहसीलदार मा. कल्याणकुमार डहाट, पोलीस उपनिरिक्षक मा. उईके मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, शारीरिक शिक्षण, खेळ व क्रीडा विभागाचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शशिकांत गेडाम उपस्थित होते.    
 याप्रसंगी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून मा. कल्याणकुमार डहाट यांनी महाविद्यालयाचे अभ्यासाच्या क्षेत्रात नाव लौकीक आहे. विद्यापीठात नॅक ‘अ’ दर्जा व सर्वप्रथम असा सन्मान मिळविलेल्या महाविद्यालयाने क्रीडा व खेळात सुद्धा असाच दर्जा मिळवावा म्हणून अपेक्षा व्यक्त केली. 
आपल्या प्रस्ताविकातून प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी अनेक विद्यार्थी अज्ञानामुळे खेळाला दुय्यम स्थान देतात. परंतु नैपुण्य असेल तर खेळाद्वारे अनेक विद्यार्थी आपले करीयर घडवू शकतात. खेळाद्वारे मन सुदृढ होण्यास मदत मिळते म्हणून खेळात आवडीने सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन केले. 
दि. १७ ते १९ ऑक्टोबर पर्यंत तीनदिवसीय चालणाऱ्या या स्पर्धेत चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपूरी, वडसा, तळोधी, सिंदेवाही, विसापूर, कोरची, गडचांदूर, वरोरा येथील एकूण १४ संघांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयातून संघ व्यवस्थापक डॉ. ओमप्रकाश अनेजा, डॉ. अनुरंभा राय, डॉ. नागलपांडे, श्री. राजू मेश्राम, मुंडे मॅडम इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते. पंच म्हणून श्री. प्रकाश लोखंडे, श्री. अन्वर शेख, श्री. अभिजीत कोसे, श्री. आशिष कोसे सहभागी झाले. प्रशिक्षक म्हणून श्री. अश्विन बांबोळे सहभागी झाले. 
 कार्यक्रमाचे संचालन डॉ. विजय रैवतकर यांनी केले तर आभार डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post