' उपचारांमुळे 13 वर्षीय मुलीचा कॅन्सर झाला गायब



21 डिसेंबर 2022
कॅन्सरला बळी पडलेली अलिसा एका नव्या औषधाच्या पहिल्याच डोसने बरी व्हायला लागलीय.

अलिसाला ल्युकेमियाचं निदान झालं होतं, कोणत्याही प्रकारच्या औषधांचा तिच्यावर फरक पडत नव्हता.

यावर ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पर्याय शोधायचं ठरवलं. त्यांनी जैविक अभियांत्रिकीचा वापर करत "बेस एडिटिंग" करून एक नवं औषध तयार केलं.

सहा महिने अलिसावर उपचार करण्यात आले, त्यानंतर टेस्ट केल्यावर कॅन्सर आढळून आला नाही. पण तरीही कॅन्सर पुन्हा बळावू शकतो या भीतीने डॉक्टर अलिसावर नजर ठेवून आहेत.

13 वर्षांची अलिसा लिसेस्टर मध्ये राहते. मागच्या वर्षीच्या मे महिन्यात तिला टी-सेल अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाचे निदान झालं.

आपल्या शरीरात असणाऱ्या टी-सेल्स आपल्या शरीराच्या संरक्षक पेशी असतात. जर शरीरात कोणत्याही विषाणूचा धोका आढळला तर त्या तो शोधून नष्ट करतात.

पण अलिसाच्या शरीरात या पेशींच प्रमाण मर्यादेबाहेर वाढू लागलं, जे तिच्या शरीरासाठी घातक आहे.
थोडक्यात अलिसाला या पेशींमुळे झालेला कॅन्सर दिवसेंदिवस जीवघेणा व्हायला लागला होता. तिच्यावर केमोथेरपी करण्यात आली, बोन-मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आलं पण याचा काहीच परिणाम होत नव्हता.

आता अलिसाला आराम मिळेल अशी काही औषधं देणं हा एकमेव पर्याय शिल्लक होता.

शेवटी काय, तर मी या जगातून निघून गेले असते, असं अलिसा सांगते.

अलिसाची आई किओनाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

ती सांगते, मागच्या वर्षीचा ख्रिसमस अलिसाबरोबर कदाचित शेवटचा ख्रिसमस असेल असं आम्हाला वाटलं. पण आमचं नशीब बलवत्तर म्हणून जानेवारीत आम्ही तिचा 13 वा वाढदिवस साजरा केला.
अलिसा तिचा 13 वा वाढदिवस साजरा करू शकली यामागे जेनेटिक्सची कृपा होती.

सहा वर्षांपूर्वी जेनेटिक्समध्ये बेस एडिटिंग या तंत्रज्ञानाचा शोध लागलाय.

ग्रेट ऑर्मंड स्ट्रीटच्या डॉक्टर्सने हे तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं.

बेसेस म्हणजे जीवनाचा आधार म्हणता येईल. चार प्रकारचे बेस असतात. यात अॅडेनाइन (ए), सायटोसिन (सी), ग्वानिन (जी) आणि थायमिन (टी) यांचा समावेश असतो.

हे बेस आपल्या जेनेटिक कोडचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. जसं वर्णमालेतील अक्षरं जोडून एखादा अर्थपूर्ण शब्द तयार होतो अगदी त्याचपद्धतीने आपल्या डीएनए मध्ये कोट्यवधी बेसेस एक मॅन्युअल म्हणजेच पुस्तिका तयार करतात.

बेस एडिटिंग मध्ये शास्त्रज्ञ जेनेटिक कोडच्या हव्या असलेल्या भागात झूम करून बेसचं मॉलेक्युलर स्ट्रकचर बदलतात आणि अपेक्षित असलेलं मॉलेक्युलर स्ट्रकचर रिप्लेस करून जेनेटिक इन्स्ट्रक्शन्स बदलतात.

ग्रेट ऑर्मंड स्ट्रीटच्या डॉक्टर्सने या बेस एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अलिसाच्या शरीरातील घातक टी सेल्स मारण्यासाठी नव्या टी सेल्स जनरेट करायचं ठरवलं.

त्यांनी डोनरकडून मिळवलेल्या निरोगी टी सेल्सवर काम करायला सुरुवात केली.

पहिल्या बेस एडिटमध्ये टी-सेल्स अलिसाच्या शरीरावर हल्ला करणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार होती.
प्रत्येक टी सेल्सवर CD7 नावाचं केमिकल मार्किंग असतं ते दुसऱ्या टप्प्यात काढून टाकण्यात येणार होतं.

केमोथेरपी सुरू असताना या सेल्स मारल्या जाऊ नयेत यासाठी त्यावर एक अदृश्य आवरण असतं. तिसऱ्या एडिट मध्ये हे आवरण सुरक्षित करावं लागणार होतं.

शेवटच्या टप्प्यात अलिसाच्या शरीरात या बेस एडिट केलेल्या सेल्स सोडण्यात येणार होत्या.

नव्याने शरीरात गेलेल्या टी सेल्सवर CD7 नावाचं केमिकल मार्किंग नसल्यामुळे, तिच्या शरीरात ज्या कॅन्सर तयार करणाऱ्या टी सेल्स होत्या आणि ज्यावर CD7 नावाचं केमिकल मार्किंग होतं त्या नष्ट करण्यास मदत मिळणार होती.

जर ही थेरपी तिचं काम करण्यात यशस्वी झाली तर दुसऱ्या टप्प्यात बोन-मॅरो ट्रान्सप्लांट करून अलिसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात येणार होती, तसंच तिच्या टी-सेल्स काम सुरू करणार होत्या.

ही सगळी कल्पना अलिसाच्या कुटुंबीयांना सांगण्यात आली.

यावर अलिसाची आई किओना विचारात पडली पण अलिसाने मात्र ही थेरेपी घेण्याचा निर्णय घेतला.

यूसीएल आणि ग्रेट ऑरमंड स्ट्रीटचे प्रोफेसर वसीम कासिम सांगतात, "अशी थेरेपी घेणारी अलिसा पहिलीच रुग्ण आहे."

याला तुम्ही जेनेटिक हेराफेरी म्हणू शकता. जेनेटिक्स हे अतिशय मोठं आणि जलद गतीने विस्तारणारं क्षेत्र आहे.
जेव्हा अलिसाच्या शरीरात बेस एडिटेड सेल्स सोडण्यात आल्या तेव्हा त्यांनी आपलं काम चोखपणे पार पाडलं. त्यांनी तिच्या शरीरातील कॅन्सरच्या टी-सेल्स आणि रोगापासून संरक्षण करणार्‍या सेल्स अशा दोन्ही सेल्सवर हल्ला केला.

एका महिन्यानंतर, अलिसाला तिची रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा वाढवण्यासाठी बोन-मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागलं.

अलिसा जवळपास 16 आठवडे हॉस्पिटलमध्ये होती. या काळात तिला तिच्या लहान भावालाही भेटता आलं नाही, कारण तिचा भाऊ शाळेत जातो. त्याच्याकडून अलिसाला जंतू संसर्ग होण्याची शक्यता होती.

तीन महिन्यांनंतर तिची कॅन्सरची टेस्ट करण्यात आली त्यावेळी पुन्हा कॅन्सरची लक्षणं दिसू लागली. पण अलीकडे ज्या दोन टेस्ट झाल्या त्यात मात्र ही लक्षणं दिसली नाहीत.

अलिसा सांगते, "तुम्ही लहान लहान गोष्टीत आनंद शोधायला हवा, मी खूप कृतज्ञ आहे की, मी आज इथं आहे."

"माझ्यावर हा प्रयोग झाला ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. भविष्यात याचा फायदा इतर मुलांनाही होईल."

ती आता ख्रिसमसची वाट बघते आहे, तिला तिच्या काकूच्या लग्नात करवली बनायचं आहे, शाळेत जायचं आहे, जशी सामान्य माणसं जगतात तसं सामान्य आयुष्य तिला जगायचं आहे.

तिला आता पुन्हा कॅन्सर होणार नाही अशी आशा तिच्या कुटुंबीयांना आहे. त्यांना जो वेळ मिळालाय त्याबद्दल ते आधीच कृतज्ञ आहेत.
अलिसाची आई किओना सांगते, "या वर्षातले शेवटचे तीन महिने अलिसा घरी होती, आणि हे एखाद्या गिफ्ट पेक्षा कमी नव्हतं."

तिचे वडील जेम्स सांगतात, "मला अलिसाचा अभिमान वाटतो. ती ज्या परिस्थितीतून गेली आहे, त्या परिस्थितीतही तिने तिचा उत्साहीपणा टिकवून ठेवला."

ल्युकेमियाग्रस्त मुलं मुख्य उपचारांना प्रतिसाद देतात. पण अशा बेस एडिट थेरपीमुळे त्यांना आणखीन फायदा होऊ शकतो.

क्लिनिकल ट्रायलचा भाग म्हणून ज्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यातल्या 10 लोकांपैकी अलिसा ही पहिली आहे.

ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट हॉस्पिटलमधील बोन-मॅरो ट्रान्सप्लांट विभागातील डॉ. रॉबर्ट चिएसा सांगतात, "वैद्यकशास्त्रातील हे एक नवं क्षेत्र आहे. आणि कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आणि त्यासाठी काम करणं खूप थरारक आहे."
डॉ. डेव्हिड लिऊ हे बेस एडिटिंगमध्ये सामील झालेल्या शास्त्रज्ञांच्या चमूचा एक भाग होते. ते सांगतात, अशा तंत्रज्ञानाचा शोध लागल्यानंतर अवघ्या सहा वर्षांत कोणावर तरी उपचार करणं विश्वास न बसण्यासारखं आहे.

जेव्हा अलिसावर ही थेरेपी सुरू करण्यात आली तेव्हा प्रत्येक बेस एडिटमध्ये जेनेटिक कोडचा एक सेक्शन ब्रेक करावा लागत होता. पण त्याहीपुढे जाऊन असे काही ऍप्लिकेशन्स असतात जिथं तुम्हाला बिघडलेल्या इन्स्ट्रक्शन्स फक्त दुरुस्त कराव्या लागतात. उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास, सिकलसेल अॅनिमिया फक्त एका बेस एडिटमध्ये बरा होऊ शकतो.

त्यामुळे सिकलसेल डिसीज, हाय कोलेस्टेरॉल आणि ब्लड डिसऑर्डर बीटा-थॅलेसेमिया यावर बेस एडिटिंग करता येईल का याची चाचपणी सुरू आहे.

डॉ लिऊ सांगतात की, "बेस एडिटिंग उपचार नुकतेच सुरू झाले आहेत. थोडक्यात विज्ञान आता जीनोमवर नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने महत्त्वाची पावलं उचलत आहे."

Post a Comment

Previous Post Next Post