भरदिवसा घरात घुसून चुलतीवर बलात्कार; 30 वर्षीय नराधम पुतण्याला 10 वर्ष सक्तमजुरी


कोल्हापूर :- शेजारीच राहणाऱ्या चुलतीच्या घरावरील खापऱ्या काढत घरात प्रवेश करून बलात्कार करणाऱ्या नराधम 30 वर्षीय पुतण्याला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्याता आली.आरोपीला अटकेपासून जामीन न मिळाल्याने जेलमध्येच आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात 7 फेब्रुवारी 2021 घडली होती. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आज हा निकाल दिला.


5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी आणि दोन वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याचे आदेश दिले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नराधम पुतण्याने 7 फेब्रुवारी 2021 रोजी भरदिवसा शेजारीच राहत असलेल्या चुलतीच्या घराच्या खापऱ्या काढून घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता. नराधमाने पोलिसात तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही तिला दिली. या घटनेनंतर चुलतीने चंदगड पोलिसात तक्रार दिल्यानंतर अटक करण्यात आली होती. 



या घटनेचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. सरकार पक्षाकडून 7 साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे आणि सरकारी वकील अ‍ॅड. एस. ए. तेली यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश देशमुख यांनी सख्ख्या चुलतीवरील बलात्काराच्या आरोपाखाली त्या पुतण्याला शिक्षा ठोठावली. 




दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने 29 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. यापूर्वी त्याच तरुणीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे दुर्दैवी आई वडिलांना मुलीच्या अशा निर्णयाने निराधार होण्याची वेळ आली आहे. 


करवीर तालुक्यातील बीडशेडमध्ये सानिका सर्जेराव सातपुते (वय 24) या तरुणीने मंगळवारी पहाटे राहत्या घरीच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. एकुलत्या एक असलेल्या लेकीने उचललेल्या टोकाच्या पाऊलाने आई वडिल मुळापासून हादरून गेले आहेत. दोन मुलींनी आत्महत्या केल्याने सातपुते कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. वडिल सर्जेराव सातपुते सानिका न उठल्याने पाहण्यासाठी गेले असता सानिका आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आली. सर्जेराव सातपूते यांनी बीडशेडमध्ये जागा घेऊन घर बांधले होते. एक महिन्यांपूर्वीच त्यांनी वास्तूशांती केली होती. मात्र, मुलीने त्याच घरात आत्महत्या केली.



Post a Comment

Previous Post Next Post