भाऊ तू लाच कोठेही दे.. पण दे... असे म्हणत चक्क बाथरूममध्ये घेतली लाच


नाशिक:- जिल्ह्यात लाचखोरीच्या सातत्याने वाढ होत आहे. दिवसेंदिवस लाचेचे प्रकार उघडकीस येत असताना अशा प्रकारे इतरही अधिकारी कारवाईला न जुमानता सर्रास लाच घेत आहेत. गेल्याच आठवड्यातील लाचखोरीची घटना ताजी असतांना आता निवासी नायब तहसीलदारास लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्याला लाचखोरीच्या घटनांनी अक्षरशः पोखरून काढले आहे. मागील आठवड्यात नाशिकच्या महावितरण विभागातील तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता एक महिला नायब तहसीलदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडली आहे. निफाड तालुक्यातील निवासी नायब तहसीलदार कल्पना शशिकांत निकुंभ असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. तर या महिला अधिकाऱ्याचे सोबत तहसील कार्यालयातील कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

निफाड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व कोतवाल याने 40 हजारांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 35 हजार लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांचे चुलत आजोबा व इतर यांचे मौजे पिंपळगाव नजीक मधील गट नंबर 13 /1/1 पैकी क्षेत्र 8300.00 चौ. मीटर क्षेत्र बिनशेती करणे कामी केलेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रकरणातील कार्यालयीन टिप्पणीवर सही करून सदरचे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे सादर करण्याच्या मोबदल्यात यातील नायब तहसीलदाराने तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तडजोड अंती 35 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच यातील निवासी नायब तहसीलदार निकुंभ यांच्या सांगण्यावरून कोतवाल कटारे यांनी प्रशासकीय इमारतीमधील पुरुष प्रसाधन गृहात सदर लाच रक्कम 35 हजार लाच स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासाठी अँन्टी करप्शन ब्युरो पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहसापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्यासोबत सापळा पथक पो.ना. अजय गरुड, पो.ना.किरण अहिरराव, पोहवा. संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान एसीबीकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने त्यांच्या कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post