उंदीर हे केवळ त्यांचं अन्न नाही, ते उंदीर भेट म्हणून देतात, हुंड्यातही उंदीर देतात

उंदीर हे केवळ त्यांचं अन्न नाही, ते उंदीर भेट म्हणून देतात, हुंड्यातही उंदीर देतात
झोपण्यापूर्वी आपण एकदा हे पाहतो की खाण्याची वस्तू जमिनीवर किंवा टेबलावर राहिलेला नाही ना. चुकून राहिला तर उंदीर रातोरात त्याचा फज्जा उडवणार हे नक्की.


काही लोकांसाठी उंदराला पाहणं शिसारी आणणारं असतं. न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरात उंदरांपासून सुटका करून घेण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या हुडकल्या जातात. पण काही ठिकाणी उंदीर किळसवाणे समजले जात नाहीत.

जगातल्या काही ठिकाणी उंदरांपासून खाण्यापिण्याचे पदार्थ तयार केले जातात. 7 मार्चला भारतातल्या पर्वतांमध्ये दुर्गम आदिवासी भागात 'युनंग आरान' नावाचा सण साजरा केला जातो. हा एक वेगळ्याच प्रकारचा सण असतो ज्यामध्ये उंदरापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार केले जातात.
आदिवासी समाजाला आवडणाऱ्या पदार्थांपैकी एक 'बोले बलाक उइंग' उंदरापासूनच तयार केला जातो. उंदराचं पोट, लिव्हर, अंडकोश, पाय हे सगळं मीठ, मिरची, मसाला आलं याबरोबर उकळून हा पदार्थ तयार केला जातो. या समाजासाठी कोणत्याही प्रकाराचा उंदीर मग तो घराच्या आसपासचा असो किंवा जंगलातला- तो खाण्यासाठीच वापरला जातो. फिनलंडमधल्या ओलो विद्यापीठातील व्हिक्टर बेनो मेयर रोचो सांगतात की उंदराची शेपटी आणि पाय यांची चव खासच असते. संशोधनासाठी ते आदिवासी समाजातल्या अनेक लोकांशी बोलले. खाण्यापिण्यासाठी उंदराचा वापर यावर त्यांचं संशोधन बेतलेलं आहे.
उंदीर जगात अनेक ठिकाणी खाल्ले जातात.

उंदरांचं मांस किती उत्तम?
एरव्ही आपल्याला हैराण करुन सोडणाऱ्या उंदरांविषयी संशोधनादरम्यान एक वेगळीच गोष्ट लक्षात आली. माहिती देणाऱ्यांनी सांगितलं की उंदरांचं मांस अतिशय रुचकर आणि चविष्ट लागतं.

लोकांनी त्यांना सांगितलं की, उंदीर नसतील तर मेजवानीला काही अर्थच नाही. आनंदाच्या सेलिब्रेशनलाही काही अर्थ नाही.

खास पाहुणे, विशेष भेटी, नातेवाईकांचा गोतावळा- निमित्त काहीही असो उंदराचं मांस सर्वोत्तम पर्याय आहे. उंदीर केवळ त्यांच्या खाण्यापिण्याचाच भाग आहे असं नाही. ते एकमेकांना उंदीर भेट म्हणूनही देतात. जीव गमावलेले उंदीर एकमेकांना भेट म्हणून दिले जातात.

हुंड्यातही उंदीर भेट दिले जातात. मुलगी सासरी जाते तेव्हा माहेरच्या मंडळींकडून व्याहींना उंदरांचा नजराणा भेट दिला जातो.

युनंग आरान सणाच्या दिवशी सकाळी लहान मुलांना दोन मेलेले उंदीर भेट म्हणून दिले जातात. जसं ख्रिसमसच्या सकाळी लहान मुलांना खेळणी भेटी दिल्या जातात तसंच मेलेले उंदीर दिले जातात.
कुठे कुठे बनवतात उंदराचं मटण?
आदिवासी लोकांना उंदरांची आवड नेमकी कधी लागली याविषयी ठोस माहिती नाही.

पण मेयर रोचो यांच्या मते उंदीर खाणं त्यांच्या आयुष्याचा अनेक वर्ष भाग आहे. ते सांगतात, हरीण, बकरी, म्हैस गावाजवळच्या परिसरात असतात पण आदिवासी समाजाला उंदीरच खायला आवडतात. ते सांगतात उंदरांना पर्याय नाही.

रोचो शाकाहारी आहेत पण तरी त्यांनी उंदराचं मांस खाऊन पाहिलंय. गंध वगळता उंदराचं मांस बाकी प्राण्यांच्या मांसासारखंच लागतं.
पदार्थविज्ञानाच्या लॅब कोर्सची आठवण करुन देणारा अनुभव आहे. यामध्ये उंदीर, घूसी यांच्या अनॉटॉमीचा अभ्यास केला जातो.

उंदरांचं मांस खाणं हे भारतातल्या एका छोट्याशा गावातल्या पाड्यापुरतं मर्यादित नाही. ब्रिटनमधले टीव्ही सूत्रधार स्टीफन गेट्स यांनी जगभरातल्या अनेक देशांना भेट दिली. विचित्र गोष्टी खाणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या.

कॅमेरुनमधल्या याऊंडे शहराच्या बाहेर त्यांनी उंदराचं एक फार्म बघितलं.

हे उंदीर एकदम खास आहेत कारण त्यांची किंमत चिकन आणि भाज्यांपेक्षाही महाग आहे.

उंदीर एवढे चविष्ट कसे होतात?
उंदरांच्या चवीविषयी विचारलं तर ते म्हणाले माझ्या आयुष्यात खाल्लेलं सर्वोत्तम चवीचं मटण.

उंदराचं मांस टोमॅटोबरोबर शिजवण्यात आलं. डुकराचं मांस जसं मऊ लागतं तसं लागतं. धीम्या आचेवर जसं ते मांस शिजवलं जातं तशीच काहीशी प्रक्रिया केली जाते.

रसाळ चविष्ट असा परतलेला स्ट्यू असं या मांसाचं वर्णन केलं जाईल.

बिहारमध्ये दलित समाजाबरोबर जेवणाचा आस्वाद
श्रीमंत, जमीनदार लोकांच्या जमिनीची देखभाल करणाऱ्या कामगार मंडळींबरोबर गेट्स यांनी वेळ व्यतीत केला.

त्यांच्या शेतात उंदीर हैदोस घालत असल्याने ते खाण्याची परवानगी या समाजाला होती.

हे छोटे उंदीर खायला नरम असतात. छोट्या कोंबडीप्रमाणे लागतात. जळत्या केसांचा दर्प मात्र येतो. छोट्या जनावरांचं मांस खराब होऊ नये यासाठी केस जाळून त्याला खरपूस भाजण्यात येतं.

त्यामुळे खाताना भयंकर दर्प येतो. तिखट स्वाद असतो, आतून खूप छान लागतं. उंदराचं आतलं मांस मस्त असतं.

जगभरातले चविष्ट उंदीर
उंदरांबाबत आपली चव अतिशय जुनी आहे. नेब्रास्का विद्यापीठातील एका संशोधनानुसार चीनमधल्या तांग साम्राज्यात (618-907) या कालावधीत उंदीर खाल्ले जात असत. त्यांना घरगुती हरीण म्हटलं जात असे.

तांग साम्राज्यात मधात घोळवलेले नवजात उंदीर हा खास पदार्थ असे.
दोनशे वर्षांपूर्वी घरात येणाऱ्या उंदरांशी साधर्म्य असणारे क्योरे नावाचे उंदीर न्यूझीलंडमधले अनेक लोक खात असत.

न्यूझीलंडच्या विश्वकोशानुसार तीर्थयात्रांना क्योरे खिलवण्यात येत असत. त्याला मुद्रा म्हणूनही वापरण्यात येत असत. लग्नसोहळ्यांमध्ये ते एकमेकांना दिले घेतले जात.

फिलिपीन्सच्या इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ग्रांट सिंगलटन यांच्यानुसार कंबोडिया, लाओस, म्यानमार, फिलिपीन्सच्या काही भागात तसंच इंडोनेशिया, थायलंड, घाना, चीन आणि व्हिएतनाममध्ये उंदीर अगदी नियमितपणे खातात.

उंदरांचे प्रकार आणि चव
सिंगलटन यांनी सांगितलं की त्यांनी व्हिएतनामच्या मेकॉन्ग डेल्टा इथे कमीत कमी सहावेळा उंदराचं मांस खाल्लं आहे. तांदळाच्या शेतातले उंदीर साधारण ससाच्या मांसाप्रमाणे लुसलुशीत लागतात.

सिंगलटन यांनी लाओसमध्ये तसंच म्यानमारमधल्या काही भागातही उंदरांच्या मांसाचा आस्वाद घेतला आहे. उंदरांच्या मांसानुसार त्यांचे पाच प्रकार ओळखू शकतो असं ते म्हणाले.

आफ्रिकेतल्या काही समाजांमध्ये उंदीर खाण्याची परंपरा जुनी आहे. नायजेरियातही उंदीर सर्वजण खातात. नायजेरियातल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी अफाकी अकीती विद्यापीठाशी संलग्न मोजीसोला ओयारिका यांच्या मते उंदरांना पक्वान्न समजलं जातं. बीफ आणि मासांपेक्षा हे उंदीर महाग असतात. ते उकडून, वाफवून, शिजवून खाता येऊ शकतात.

तुमच्या आजूबाजूच्या रेस्तराँमध्ये मेन्यूकार्डात उंदराने बनवलेलं मांस मिळणार नाही. पण जगभरात अन्नपदार्थासंदर्भात बदलत जाणाऱ्या सवयी पाहता उंदरांपासून तयार केलेले पदार्थ मेन्यूकार्डावर असतील. एकदा खाऊन पाहा, तुम्हाला आवडेल.

Post a Comment

Previous Post Next Post