गुजरात दंगलीवरून बिलावल भुत्तोंंची नरेंद्र मोदींवर जहरी टीका, भारताची तीव्र प्रतिक्रिया

  


पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. त्याविरोधात भारतानं तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. भाजपसुद्धा या टीकेविरोधात आक्रमक झाली आहे.

भाजपने शुक्रवारी दुपारी नवी दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं केली आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत, भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला विरोध केलाय. त्यांच्या या विरोधानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं.

भारताने 1 डिसेंबर रोजी एका महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.

यावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीदरम्यान दहशतवादासंबंधी ब्रीफिंग झालं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भुत्तो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी बिलावल यांनी काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासंबंधी आवाहन केलं. त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आपली वचनबद्धता सिद्ध करावी असंही म्हटलं.
त्यानंतर दहशतवादासंबंधी पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जे वक्तव्य केलं त्यावर पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना बिलावल यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं.

बिलावल भुत्तो यांच्या या वक्तव्याचा भारतात जोरदार विरोध होतोय.

बिलावल भुत्तो यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर विस्ताराने उत्तर दिलंय.

नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘गुजरातचा कसाई’
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो म्हणाले,

"मला भारताला सांगायचं आहे की ओसामा बिन लादेनचा मृत्यू जरी झाला असेल तरी गुजरातचा कसाई अजून जिवंत आहे आणि ते भारताचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान होईपर्यंत त्यांना या देशात (अमेरिकेत) प्रवेश करण्यावर बंदी होती. हे आरएसएसचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत. आरएसएस काय आहे? ती सुद्धा एक प्रकारची दहशतवादी संघटना आहे."

“त्यांना गांधींची विचारधारा मान्य नाही, उलट सध्याचं भारत सरकार गांधींच्या मारेकऱ्यांला हिरो मानतं. पाकिस्तानातील दहशतवादयांना शेजारील देशाकडून पाठिंबा मिळतोय. बलुचिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा सक्रियपणे प्रयत्न सुरू आहे."

"लाहोरमधील जौहर टाऊन बॉम्बस्फोटात भारताचा सहभाग असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. पाकिस्तानातील दहशतवादाला जबाबदार असलेल्या घटकांना न्याय द्यावा.

दहशतवादी गटांना सीमेपलीकडून प्रशिक्षण आणि आर्थिक मदत मिळते, ते रोखण्याची गरज आहे. पाकिस्तानला दहशतवादाविरुद्धच्या युद्धात मिळालेल्या यशाचा अभिमान आहे, कारण आमच्या देशाने दहशतवादाविरुद्धच्या कृतीसाठी ठोस पावलं उचलली आहेत."
पाकिस्तानने आपला दृष्टिकोन बदलायला हवा
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याविषयी स्टेटमेंट प्रसिद्ध करत म्हटलंय की,

पाकिस्तानचं हे विधान अत्यंत खालच्या पातळीचं आहे. पाकिस्तानचा त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांबाबतच्या दृष्टिकोनात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांनी भारताला दोष देऊ नये.
दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी आर्थिक मदत, दहशतवादाला आश्रय देणं, त्याला स्पॉन्सर करण्याची पाकिस्तानची भूमिका नेहमीच चर्चेत राहिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेलं असभ्य वक्तव्य हे त्या देशात दहशतवादाचा प्रॉक्सी म्हणून वापर करण्यात येत असल्याचा परिणाम आहे.
न्यूयॉर्क, मुंबई, पुलवामा, पठाणकोट आणि लंडनसारख्या कित्येक शहरं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला बळी पडलेत. पाकिस्तान त्यांच्या स्पेशल टेररिस्ट झोनमधून संपूर्ण जगाला दहशतीची निर्यात करतो. हा 'मेक इन पाकिस्तान' दहशतवाद थांबवावा लागेल.
पाकिस्तान ओसामा बिन लादेनचा हुतात्मा म्हणून गौरव करतो. तर लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम सारख्या दहशतवादयांना आश्रय देतो. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या 126 दहशतवाद्यांपैकी 27 दहशतवादी पाकिस्तानात राहतात.
मुंबई हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी अंजली कुलथे यांनी संयुक्त राष्ट्रात जे भाषण केलं ते पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्षपूर्वक ऐकायला हवं होतं. अंजलीने पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या तावडीतून 20 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले होते.
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या देशातील दहशतवादी मास्टर माइंडकडे अधिक लक्ष द्यायला हवं. पाकिस्तानमध्ये दहशतवादाला स्टेट पॉलिसीच्या रुपात पुढं आणलं जातंय. पाकिस्तानने आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांच्या पंतप्रधान मोदींविरोधातील वक्तव्याचा भाजपने तीव्र निषेध केला असून त्याविरोधात आंदोलनही केलं आहे.

एस. जयशंकर यांनी काय उत्तर दिलं होतं?
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर आणि दहशतवादी घटनांसाठी भारताला जबाबदार धरल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

ते म्हणाले की, "जो देश अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन-लादेनची जबाबदारी घेऊ शकतो, जो देश त्याच्या शेजारी देशाच्या संसदेवर हल्ला करू शकतो, त्या देशाने यूएनमध्ये बसून 'उपदेशक' बनण्याची काही एक गरज नाही."

जयशंकर यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. तसंच या दहशतवादी हल्ल्यात 20 गर्भवती महिलांना वाचवणाऱ्या मुंबईच्या परिचारिका अंजली कुलथे यांचाही उल्लेख केला.

यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, 26/11 च्या हल्ल्यातील पीडितांना अद्यापही न्याय मिळालेला नाही.

अंजली कुलथे यांनी एक दिवस आधीच सुरक्षा परिषदेसमोर 26/11 चा घटनाक्रम सांगितला होता. त्यांनी सांगितलं की, "माझ्या अंगात जो गणवेश होता त्याने मला धैर्य मिळालं, तर माझ्या नर्सिंगप्रति असलेल्या विचारांनी स्पष्टता दिली.”

2001 मध्ये भारतीय संसदेवर जो हल्ला झाला होता, त्याचा उल्लेख करताना जयशंकर म्हणाले, "18 वर्षांपूर्वी 13 डिसेंबर रोजी पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी दिल्लीतील संसद परिसरावर हल्ला केला होता. तिथं त्यांनी उघड उघड फायरिंग केलं होतं. यात नऊ लोकांचा जीव गेला होता."

दहशतवादाच्या मुद्द्यावरून जयशंकर यांनी मागच्या 24 तासांत पाकिस्तानवर दोनदा तोफ डागलीय. ते म्हणाले की, जग पाकिस्तानकडे दहशतवादाचे केंद्र म्हणून पाहतं.
-०-

Post a Comment

Previous Post Next Post