तुझ्या मुलीसह चित्रपट बघ आणि हिंमत असेल तर…”, विधानसभा अध्यक्षांचं शाहरुखला जाहीर आव्हान

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनीही बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाला विरोध केला आहे. “शाहरुखने आपल्या मुलीसह चित्रपट पाहावा आणि तो फोटो अपलोड करत संपूर्ण जगाला सांगावं. शाहरुखने असाच चित्रपट प्रेशित यांच्यावर करावा आणि तो चालवून दाखवावा असं मी आव्हान देतो,” असं ते म्हणाले आहेत.

मध्य प्रदेशात एकीकडे पठाण चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली जात असताना, पाच दिवसांच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावर सभागृहात सत्ताधारी भाजपाकडून चर्चा होण्याची शक्यता आहे.


विरोधी पक्षनेते डॉक्टर गोविंद सिंग यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनीही पठाण चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट आपल्या मूल्यांच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

“हा मुद्दा पठाणचा नाही, तर कपड्यांचा आहे,” असं सुरेश पचौरी म्हणाले आहेत. ते म्हणाले की “भारती संस्कृतीत कोणत्याही महिलेने अशा प्रकारे कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणं योग्य नाही. मग तो हिंदू, मुस्लीम किंवा इतर कोणताही धर्म असो”.

गेल्या बुधवारी नरोत्तम मिश्रा यांनी पठाण चित्रपटातील गाण्यावर आक्षेप नोंदवला होता. “गाण्यातील वेशभूषा आक्षेपार्ह आहे. या गाण्यातून घाणेरडी मानसिकता दिसत आहे,” असं ते म्हणाले होते. याशिवाय गाण्यात दिपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकीनी घातल्याचा मुद्दाही उपस्थित केला जात असून, विरोधाचं कारण ठरत आहे. गाण्यात बदल केले नाहीत तर चित्रपट मध्य प्रदेशात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post