अवैद्य दारू विक्रीला महिलांनी विरोध केला केल्यानंतर काही दारू विक्रेत्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली


चंद्रपूर : जिल्ह्यात राजूरा तालुक्यातील करोडपती गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या साखरी गाव व्यसनाधिनतेकडे जात आहे. त्यामुळे महिलांनी कुटूंबातील लोकांचा विरोध पत्करून दारुला गावातून हद्दपार करण्याचा संकल्प केला आहे. सामाजिक कार्यकर्ता अंकुश गोरे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून राजुटा पोलीस स्टेशन येथे धडक देत गावात सुरु असलेल्या अवैद्य दारु विक्रेत्यांवर कारवाही करण्याची मागणी केली असता प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर यांनी लगेच पोलीसांना गावात पाठवून अवैद्य दारू विक्रेते व त्यांच्याजवळील दारू जप्त केली आहे.

राजूरा तालुक्यातील करोडपती गाव म्हणून ख्याती असलेले साखरी गाव सध्या अवैद्य धंद्याचे माहेरघर बनले आहे. याठिकाणी कोळसा चोरी, डिझेल चोरी, भंगार चोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून गावातच खुले आम बिअर बार सारखे टेबल लावून अवैद्य दारूची विक्री मागील काही दिवसांपासून सुरु आहे. या ठिकाणी काही नागरिक आपल्या लहान मुलांना सुद्धा दारू आणण्यासाठी पाठवीत आहे, यामुळे नवीन पिढी सुद्धा पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे येथील बचत गटाच्या महिलांनी व इतर महिलांनी सामाजिक कार्यकर्ते अंकुश गोरे यांना सांगून त्यांच्या नेतृत्वात गावात दारू बंदी करण्यासाठी कंबर कसली आहे. ग्राम सभेत दारू बंदीचा ठराव मांडला असता काही आंबट शौकिनांनी याला सुद्धा विरोध दर्शविला आहे.

गावात सुरु असलेल्या अवैद्य दारू विक्रेत्यांना या अगोदरच अवैद्य दारू विक्री न करण्याच्या सूचना महिलांनी व अंकुश गोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन दिल्या होत्या. तरी दारू विक्रेते येथील काही आंबट शौकीनांच्या भरोशावर दारू विक्री राजरोसपणे करीत आहेत. अवैद्य दारू विक्रीला महिलांनी विरोध केला केल्यानंतर काही दारू विक्रेत्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामूळे त्यांची मुजोरी वाढतच आहे. दिवसाढवळ्या खुलेआम दारू विक्री होत असताना गावातील सरपंचांनी दारुबंदीला सहकार्य न केल्याने त्यांच्या विरोधात महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

गावातील तीस ते चाळीस महिलांनी अवैद्य दारू विक्रेत्याच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशन मध्ये नुकतीच धडक दिली प्रभारी ठाणेदार संतोष दरेकर यांनी लगेच ऑक्शन घेऊन साखरी येथे पोलीस कर्मचारी पाठवून अवैद्य दारू विक्रेते विशाल वांढरे व धनराज जयपूर यांना मुद्देमलासह ताब्यात घेतले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश गोरे, बबन उरकुडे, पोलीस पाटील उरकुडे, गावातील बचत गटाच्या महिला व इतर महिला युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post