बांगलादेश सीमेवर तैनात BSF ची कुत्री प्रेग्नंट, लष्करात खळबळ;


नवी दिल्ली: मेघालयला लागून असलेल्या बांगलादेश सीमेवर तैनात असलेली सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यातील एक कुत्री प्रेग्नेंट राहिल्यानं एकच खळबळ माजली आहे. लेल्सी नावाची कुत्री गरोदर राहिली. तिनं तीन पिल्लांना जन्म दिला. ही कुत्री गरोदर कशी राहिली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या नियमांच्या अंतर्गत हे आदेश दिले गेले आहेत.

४३ व्या बटालियनमधील कुत्री लेल्सीनं ५ डिसेंबरला सीमा चौकी बाघमारा येथे ३ पिल्लांना जन्म दिला. शिलाँगस्थित बीएसएफच्या क्षेत्रीय कार्यालयानं या प्रकरणाची दखल घेत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले. याची जबाबदारी बीएसएफचे डेप्युटी कमांडेंट अजित सिंह यांना देण्यात आली आहे. महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना अहवाल द्यायचा आहे.


बीएसएफसह अन्य केंद्रीय दलातील कुत्र्यांचं प्रशिक्षण, प्रजनन, लसीकरण, आहार आणि आरोग्यासंदर्भात विशेष सावधगिरी बाळगली जाते. बीएसएफच्या पशु वैद्यकीय विभागाच्या सल्ल्यानं आणि देखरेखीखाली कुत्र्यांच्या प्रजननाला परवानगी दिली जाते. कुत्र्यांच्या प्रशिक्षकांवर त्यांच्या देखरेखीची जबाबदारी असते. त्यांच्या आरोग्याची ठराविका कालावधीत तपासणी केला जाते.


बीएसएफ तळ, बीओपी किंवा ड्युटीवर तैनात कुत्र्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं जातं. ते लष्करी तळावर किंवा बीओपीमध्ये तैनात असताना त्यांच्या आसपास चोख सुरक्षा असते. कोणताही बाहेरचा किंवा भटका कुत्रा तळावर घुसू शकत नाही. बहुतांश प्रजातीच्या कुत्री वर्षातून दोनदा गर्भवती राहू शकतात. त्यासाठी कुत्री १८ महिन्यांची असणं गरजेची असतात. केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये एका वर्षातून एकदाच श्वानांना गर्भावस्थेसाठी तयार केलं जातं.



Post a Comment

Previous Post Next Post