धर्मग्रंथांवर चर्चा होते, संविधानावर का नाही?


भारत हा सर्वगुणसंपन्न असतानाही मागासलेला असल्याचे एकमेव कारण म्हणजे धार्मिकता. भारत हा एवढा धर्मांध देश आहे की धर्माच्या नावावर येथे विषमता, अंधविश्‍वास, अन्याय, अत्याचार सर्व काही खपवून घेतले जाते.
भारत हा सर्वगुणसंपन्न असतानाही मागासलेला असल्याचे एकमेव कारण म्हणजे धार्मिकता. भारत हा एवढा धर्मांध देश आहे की धर्माच्या नावावर येथे विषमता, अंधविश्‍वास, अन्याय, अत्याचार सर्व काही खपवून घेतले जाते. आणि विशेष म्हणजे धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतलेले सत्ताधारी त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात. भारतीय इतिहास बघितला तर हा इतिहास विषमता, पाखंड, अंधविश्‍वास, भेदभाव यावर आधारलेला होता.



मनुस्मृतीसारख्या ग्रंथानी तर्क, विज्ञानाच्या पलिकडे जाऊन समाजामध्ये विषमता, भेदभाव कायम राहील अशाप्रकारची शिकवण दिली आणि संविधान लागू होण्याआधी विषमतेवर आधारित, भेदभाव व वर्णभेद करणारा धर्मग्रंथ म्हणून मान्यता होती परंतु संविधानानंतर जुने सर्व कायदे रद्द करण्यात आले. इतिहासातील ग्रंथ व व्यवस्थेने लोकांना हिन, निच आणि तुच्छ समजून देशातील अनेक अन्याय अत्याचार लोकांवर केले. परंतु संविधानाची अंमलबजावणी झाली आणि देशातील प्रत्येक नागरिकांना माणूस म्हणून ओळख दिली आणि अन्याय अत्याचाराविरोधात संविधानिक संरक्षण दिले. 



भारतात आजही विषमता, भेदभाव डोक्यातून गेला नाही. याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वात महत्वाचे उदाहरण म्हणजे आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्षपणे काम करेल अशी देवाची शपथ घेऊन सुद्धा धार्मिकतेला वाव देतात. संविधानानुसार काम करण्याची शपथ घेऊन संविधानविरोधी काम करतात, धार्मिक कट्टरतेला प्रोत्साहन दिले जाते आणि विषमता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आजही इतर जाती धर्म याबाबत प्रचंड तिरस्कार व घृणा समाजामध्ये बघायला मिळते. 





एवढी विषमता आणि भेदभाव आहे की देशाचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले म्हणून काही लोक वाचत सुद्धा नाहीत एवढा द्वेष करतात. कारण त्यांना संविधान एकाच जातीसाठी बनवले आहे असे वाटतं. यासंदर्भात सरकारने कधी जागृती केली नाही. मिडीयाने कधी संविधानावर चर्चा घडवून आणली नाही. उलट इलेक्ट्रॉनिक्स मिडिया समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहे हे न्यायालयाला सांगावे लागले. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाने किती अतिरेक केला असेल याची जाणीव होते. 



भारतीय संविधानाने प्रत्येकाला प्रत्येक धर्माचे आचरण करण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. देशातील कोणत्याही धर्माचा व्यक्ती त्याच्या धर्माची उपासना आचरण करू शकतो. परंतु देशाच्या कामकाजावर, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर कोणत्याही धर्माचा प्रभाव राहणार नाही. थोडक्यात काय धर्म ही वैयक्तिक बाब असेल त्याचे आचरण किंवा प्रभाव हा घरामध्ये पाहिजे घराच्या चौकटीच्या बाहेर प्रत्येक जण भारतीय आहे आणि त्यांच्या राष्ट्रीय ग्रंथ हा भारतीय संविधान आहे. संविधान हे सर्वोच्च असते. त्याचा मानसन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 

संविधान साक्षर लोक पाहिजे जेणेकरून राज्यकर्ते संविधानाला अनुसरून काम करतात की नाही यावर लक्ष ठेवता येते. परंतु येथे परिस्थिती उलट आहे. बर्‍याच लोकांना जुन्या विषमता पसरवणार्‍या पुस्तकातील संस्कृतमधले श्‍लोक पाठ आहेत परंतु भारतीय संविधानाचे कलमे माहिती नाहीत ही शोकांतिका आहे. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे लोकांना धर्मनिरपेक्ष लोकशाही मान्य नाही तर यांना धार्मिक राज्य पाहिजे. 



एक माणुसकीची शिकवण आहे आणि ही शिकवण प्रत्येक धर्मात आहे ती म्हणजे माणसाने माणसासोबत माणुसकीने वागले पाहिजे यापेक्षा मोठा धर्म कोणताही नाही. बरं माणसाला आदर्श जिवन जगण्यासाठी धर्म असतो. म्हणजे धर्म नियमाच्या अधिन राहून येथे योग्य मार्गाने जिवन जगता यावे यासाठी धर्म असतो. परंतु देशात धर्माच्या नावाने स्वैराचार सुरु आहे. दुसर्‍या धर्मावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर्क विज्ञान आणि सत्य सोडून फक्तकल्पना, काल्पनिक गोष्टींवर वेळ पैसा खर्च करण्यात भारत अग्रेसर आहे.


देशातील नागरिकांचे प्रश्‍न, वाद मिटवून शातंता व सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम सरकारचे असते परंतु देशात धार्मिक वादात सरकारच सहभागी असल्याने देशात शांतता आणि सुव्यवस्था कुणी प्रस्थापित करायची? देशात स्वैराचाराला सरकारने प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे? सरकारने जनतेचे असायला पाहिजे येथे अनेक लहान मोठ्या धर्माचे लोक राहतात आणि सत्तेतील जबाबदार लोक पदावर असताना धार्मिक विषयांवर बोलून धर्मांधतेचे उदाहरण देतात. 



जगातील आदर्श लोकशाही चुकीच्या लोकांच्या हाती गेल्याने जनतेला लोकशाहीचे फळ पाहिजे तसे चाखता येईना. बरं धर्माचे नाव काढले तर लोकांचा मेंदू काम करत नाही, सत्य काय हे समजत नाही, धर्माच्या नावाखाली कोणतेही कृत्य करताना आपले चुकीचे संस्कार दिसतात याची चिंता नसून माझाच धर्म श्रेष्ठ कसा यावर भर देऊन माणसाला माणसापासून तोडले जाते. पाकिस्तान हे धार्मिक राष्ट्र आहे तेथे आज लोकांची परिस्थिती काय आहे हे सर्वांना परिचित आहे.



उपासमारीने लोक मरत आहेत. आणि आपण धर्मावरच वेळ खर्च करत आहेत. संविधान समजून घेऊन देशाचा विकास कसा साध्य होईल यावर लोकांचे लक्ष नाही कारण येथील प्रस्थापितांना समतावादी, न्यायवादी संविधान सुरवातीपासूनच मान्य नाही म्हणून यांनी जाणीवपूर्वक संविधानावर बोलणे, चर्चा करणे टाळले जाते. 



आजही देशातील जनतेला संविधानाविषयी आपुलकी, प्रेम व सन्मान पाहिजे तसा निर्माण झाला नाही याचे महत्त्वाचे कारण डोक्यात असलेली धार्मिक विषमता. म्हणून सरकार आणि सरकारच्या इशार्‍यावर चालणारा मिडिया विषमतावादी ग्रंथातील एखाद्या वादग्रस्त कालबाह्य आणि चुकीच्या शब्दांवर चर्चा करतात पण देशाच्या आणि सर्वाच्या संविधानावर चर्चा केली जात नाही यावरून सरकार, धार्मिक जनता आणि मिडीयाचा दुटप्पीपणा दिसून येतो.


  लोकशाही आणि संविधान टिकवून समाजामध्ये रुजवायचे असेल तर त्यावर चर्चा होणे ते जनतेला समजून सांगणे आवश्यक आहे. मग सरकार हे काम करत नाही मिडिया हे काम करत नाही तर हे काम करायचे कोणी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न येतो. सुरवातीपासूनच संविधान, सामाजिक समस्येवर आंदोलन, सामाजिक लढा याची जबाबदारी आंबेडकरवादी लोकांवर आलेली आहे. 



परंतु संविधानाबाबत एक गोष्ट अशी ही आहे काही स्वतःला आंबेडकरवादी समजणार्‍या लोकांनी संविधान डोक्यावर घेतले डोक्यात घेतले नाही म्हणून त्यांना ही संविधान कळाले नाही, परंतु कोणी त्याला सांगितले तर संविधानाच्या विरोधात हे असे झाले तसे झाले तर त्याचे रक्त खळबळून उठते परंतु संविधान डोक्यात नसल्याने रोज संविधानाच्या विरोधात होत असलेल्या कामाची त्याला जाणीव नसते. म्हणून संविधानाविषयी जनजागृती चर्चा आज काळाची गरज आहे. 



आज स्वतःला आंबेडकरवादी समजणारे संविधानाला डोक्यावर घेणार्‍या लोकांना जर संविधानाविषयी जागृती नसेल तर यापेक्षा जास्त दु:ख कोणतेच नाही. धार्मिक लोक विषमता, तिरस्कार असलेले विचार चांगले कसे आहेत हे पटवून देतात परंतु भारतीय संविधान हे देशाचे कसे आहे, त्यातून मानवाचे कल्याण कसे होते हे पटवून देण्यात आंबेडकरवादी जनता कमी पडली आहे हे नाकारता येणार नाही. 



जर आम्हाला संविधानाची पेरणी समाजात देशात करायची असेल तर अगोदरच आंबेडकरवादी लोकांनी समजून घेऊन ते लोकांना समजून सांगावे. आजही आम्ही जर समतावादी आणि देशाच्या हिताचे संविधान भारतीय नागरिकांना समजून सांगू शकलो नाही तर धर्मांध लोकांचे विषमतावादी विचार रोजच ऐकायला मिळतील आणि यातून देशात अराजकता निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 



सरकार आणि मिडिया धर्मांध होऊन लोकशाही विरोधात काम करण्याचा अजेंडा राबवत आहेत. म्हणून ते संविधानावर चर्चा करत नाहीत किंवा घडवून आणत नाहीत. म्हणून आता संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी घोषणा कमी आणि संविधान जनजागृती करणे आवश्यक आहे. आजही कोणाला वाटत असेल तर संविधान कोणी बदलू शकत नाही किंवा संविधानानेच देश चालतो तर हा चुकीचा भ्रम आहे. अनेक कृत्य, शब्द हे संविधान विरोधी वापरले जात आहेत आणि नागरिकांना त्याची जाणीवही नाही. 



स्वतःला आंबेडकरवादी समजणारे नेते तर स्वार्थासाठी एवढे लाचार झाले एकीकरण सोडून संविधान विरोधी लोकांसोबत हातमिळवणी करून तेही त्यांनाच सहकार्य करत आहेत. मग सरकार आणि मिडियाला संविधान जागृती करण्याची काय गरज? सर्व आंबेडकरवादी अनुयायी एकत्र येऊन संविधान जागृती करून सरकारवर दबाव आणला तर मग संविधानावर चर्चा होईल. त्यासाठी वैचारिक एकतेची गरज आहे.

विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा ९१३०९७९३००

Post a Comment

Previous Post Next Post