जेएनयुमध्ये बीबीसी डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगवरून राडा वीज, इंटरनेट केले बंद, अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये दगडफेक



बीबीसी डॉक्युमेंटरीवरील वाद थांबताना दिसत नाही. आता दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीवरून राडा झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगची घोषणा केली. मात्र, या स्क्रीनिंगपूर्वीच विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातील वीज खंडित करण्यात आली आहे.



यासोबतच विद्यार्थ्यांवर दगडफेक केल्याचा दावा देखील केला जात आहे. अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये दगडफेक झाल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशा घोष यांनी दावा केला की, जेएनयू प्रशासनाने वीज खंडित केली आहे. दरम्यान बीबीसीची ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंटरी सीरिज नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरात दंगलीवर आधारित आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग रात्री ९ वाजता सुरू होणार होते आणि प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही, त्याला न जुमानता विद्यार्थ्यांनी स्क्रिनिग करण्याचे नियोजन केले होते. जेएनयू प्रशासनाने या स्क्रीनिंगला परवानगी दिली नाही. तसेच डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगनंतर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांनी परवानगीशिवाय डॉक्युमेंटरी दाखवल्याची बाब समोर येताच प्रशासनाने विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाची वीज आणि इंटरनेट सेवा बंद केली. मात्र, असे असतानाही विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्युमेंटरी दाखवण्यात आला.



बीबीसीच्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या डॉक्युमेंटरी सीरीजवरून वाद पेटला आहे. ही सीरीज भारतात उपलब्ध नाही, पण त्याच्या लिंक्स यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने डॉक्युमेंटरीचे एपिसोड असलेले यूट्यूब व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केले आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने हा डॉक्युमेंटरी अप्रचाराचा भाग असल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post