लुटला रे लुटला ग्रामपंचायतला लुटला

ग्रामपंचायतीने कामे न करता जनसुविधेच्या निधीची केली परस्पर उचल
- दोन कोटी रुपयांचा आला होता निधी
- मूल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतीतील प्रकार; चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर



मूल :- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतीला जन सुविधेअंतर्गत गावातील विविध विकासकामे करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.मात्र, सदर निधी एम.बी.रेकॉर्ड व कॅश बुकमध्ये खर्च दाखविण्यात आला.प्रत्यक्षात मात्र काम केलेच नसल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे.

शासनाकडून गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीला विकास निधी दिला जातो. ग्रामपंचायत मारोडाला सन २०१३-१४ ते सन २०१९ - २० या पाच वर्षांत २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.यावेळी सरपंचपदी स्वाती पुनवटकर व ग्रामविकास अधिकारी विलास भोयर कार्यरत होते.२ कोटी रुपयांच्या निधीत विशेषतः नाली बांधकाम, नळ योजना दुरूस्ती, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, तलाव सौंदर्यीकरण, सोलर स्ट्रीट लाईट, स्मशानभूमीची संरक्षक भिंत, नळयोजना पोच मार्ग, सौर कुंपण आदी कामांचा समावेश होता.
यात काही कामे अर्धवट तर काही कामे न करता एम. बी. रेकॉर्ड व कॅश बुकमध्ये नोंद करून परस्पर निधीची विल्हेवाट लावल्याचा प्रकार उपसरपंच अनुप नेरलवार यांना दिसून आला.त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या २८ फेब्रुवारी २०२२ च्या मासिक सभेत ठराव क्रमांक १३ (३) नुसार प्रश्न उपस्थित करून कामाच्या चौकशीची मागणी केली.त्यानुसार १८ एप्रिल २०२२ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.पत्राच्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद,चंद्रपूर यांनी पत्र क्रमांक १४३ / २०२२, २० मे २०२२ अन्वये गटविकास अधिकारी मूल यांना पत्र पाठवून तक्रारीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले.

संजय पुप्पलवार,विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती मूल :-

ग्रामपंचायत,मारोडा येथील उपसरपंच अनुप नेरलवार यांनी कामे न करता कॅश बुकमध्ये नोंद करून शासकीय निधीची अफरातफर केल्याची तक्रार केली होती.त्यानुषंगाने चौकशी अधिकारी म्हणून प्रत्यक्षरीत्या चौकशी केली असता यातील दोन कामे केली नसताना एम. बी. रेकॉर्ड करून रक्कम उचलल्याचे आढळले.यात कनिष्ठ अभियंता देव बघेल यांनी मी स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले.त्यामुळे सदर स्वाक्षरीची तपासणी करण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post