मेंढकी येथे विहरीत आढळला वाघीण मावशीचा मृतदेह


प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मेंडकी नियत क्षेत्रात रामाजी ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत वाघिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात मानव-वन्यजीव संघर्षात ५३ जणांचा बळी गेल्यानंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये वन विभागासोबतच वाघ, बिबटे तथा इतर वन्यजीवांबद्दल तीव्र रोष आहे. अशातच मंगळवारी जंगल परिसरात गस्त करत असताना वनरक्षक लाडे यांना ठाकरे यांच्या शेतातील विहिरीतून दुर्गंध आला. यावेळी त्यांनी शेतातील विहिरीत डोकावून पाहिले असता वाघिणीचा मृतदेह आढळला. वन पथकाने वाघिणीचा मृतदेह विहीरीबाहेर काढला.

मृत वाघिणीचे वय अंदाजे ४ ते ५ वर्षे आहे. ही वाघिण ३-४ दिवसापूर्वी विहिरीत पडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. वनाधिकारी श्रीमती डॉ. लोंढे, पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही डॉ. पराते, पशुधन विकास अधिकारी ब्रह्मपुरी डॉ. लाडे यांनी पंचनामा व शविच्छेदन केले. यानंतर मृतदेह जाळण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, तळोधी बा. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक शेंदुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सालकर, मानद वन्यजीव सदस्य विवेक करंबेकर, इको प्रो अध्यक्ष बंडू धोतरे, यश कायरकर, व उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.

या भागातील गेल्या काही दिवसांतील मानव-वन्यजीव संघर्ष पाहता हा घातपाताचा प्रकार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ताडोबा तसेच या भागातील जंगलात काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांनीच वाघाची शिकार करून, मृतदेहाला दगड बांधून विहिरीत सोडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण घटनेची चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post