एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप

शंकर मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, ११ जानेवारीला जामिनावर सुनावणी

एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप


एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी शंकर मिश्राच्या वकिलांनीही पटियाला हाऊस कोर्टात जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर आता ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राला बंगळुरू येथून अटक करून नवी दिल्लीत आणले. शंकर मिश्राला दिल्लीत आणताच न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.



दिल्ली न्यायालयाने सांगितले की आरोपी शंकर मिश्राचा मोबाईल ट्रेस करण्यात आला असून त्याचे लोकेशन बेंगळुरूमध्ये सापडले आहे. कामाच्या ठिकाणीही त्याचा शोध लागला नाही. तो मुद्दाम तपासात सहभागी होत नसल्याचे या संपूर्ण प्रकरणावरून स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, तपासादरम्यान आरोपी सतत आपले वक्तव्य बदलत होता आणि तपास अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. 



एअर इंडियाच्या फ्लाइटशी संबंधित हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली पोलीस शंकर मिश्रा यांच्यावर सतत छापेमारी करत होते. तो सतत आपली जागा बदलत होता. शंकर मिश्रा बेंगळुरूला पोहोचल्यानंतर त्याने त्याचा फोन बंद केला होता. पोलिसांनी त्याला बंगळुरू येथूनच अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post