ब्रह्मपुरी तालुक्यात शौचालयाचा खड्डा खोदताना आढळली श्रीकृष्णाची मूर्ती


ब्रम्हपुरी :- शौचालयाचे बांधकामासाठी खड्डा खोदणे सुरू होते. सात फूट खोल खड्डा खोदून झाल्यानंतर काळा दगड लागला. दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होते. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. मूर्तीला दुग्धाभिषेक करत हात जोडले. ब्रह्मपुरी तालुक्यातील येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचे इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांचे म्हणणे आहे. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.

खेडमक्ता येतील गजानन मानकर यांना खोदकाम करताना ही मूर्ती सापडली. त्यांनी मूर्तीला दुग्धभिषेक घातला. यावेळी प्रमोद मानकर, सचिन मेश्राम, गुरुदेव मानकर मारोती मेश्राम, गिरिधर गुरपुडे, मुकुंदा गुरपुदे, योगेश तुमडे, संदीप गुर्पुडे, केशव मानकर उपस्थित होते. मूर्ती सापडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. सापडलेले शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. शिल्प काळ्या दगडावर कोरलेले आहे. श्रीकृष्णाच्या डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेले आहे. चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादे मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post