मध्यरात्री घराला अचानक लागलेल्या आगीत साखर झोपेत असलेल्या सिंधू श्रीलाल टेंभुर्णे २० वर्षीय युवतीचा जळून जागीच मृत्यू




कोरची : तालुका मुख्यालयापासून 30 किमी अंतरावरील कोटगुल पोलीस मदत केंद्राच्या हदीतील अरमुरकसा येथे 6 फेब्रुवारी ला मध्यरात्री घराला अचानक लागलेल्या आगीत साखर झोपेत असलेल्या २० वर्षीय युवतीचा जळून जागीच मृत्यू झाला. या आगीत संपूर्ण घर जळून नष्ट झाले. सिंधू श्रीलाल टेंभुर्णे (20) असे मृत युवतीचे नाव आहे. तिला आई- वडील नसून दोन भाऊ आणि एक वहिनी आहे. घटनेच्या दिवशी कौलारू घराच्या एका खोलीमध्ये सिंधुकला तर दुसऱ्या रूममध्ये वहिनी आणि चिमुकला भाचा झोपलेले होते. त्या दिवशी एक भाऊ बेळगाव (घाट) येथे मंडईला, तर दुसरा भाऊ काही दिवसांपासून जंगलातील बांबू कटाईचे काम करायला बाहेरगावी गेलेला होता. नेमक्या त्याच दिवशी पहाटे ४ वाजता ही घटना घडून सिंधुकला जळून मरण पावली.

ही आग एवढ्या झपाट्याने पसरली, की घरातील भारोट्यावर (लाकडी सज्जा) साठवून ठेवलेले धान आणि घराचे लाकडी छत जळून गेले. कोटगूल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. विचारपूस करत संपूर्ण तपासणी केली. त्यात विद्युत वायरिंगचा विखुरलेला बोर्ड पाहून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र हा घातपात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ही घटना संशयास्पद असल्याने कोटगूल पोलिस मदत केंद्रात मर्ग दाखल करण्यात आला. अधिक तपास प्रभारी अधिकारी आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिलडकर करीत आहे. सदर गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याने कोटगूल पोलिसांनी पीडितांना काही कपडे व १७ हजार रुपये रोख मदत केली.

Post a Comment

Previous Post Next Post