पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरण, पोलिसांचं मोठं पाऊल, रिफायनरी समर्थक अडकला!


रत्नागिरी/ राजापूर : अन्यायाविरुद्ध धडाडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे दै. 'महानगरी टाईम्स' चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणी संशयित असलेला पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरीनाथ आंबेरकर याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्यातील पत्रकार संघटनांकडून करण्यात आली होती. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी याप्रकरणी कुणाचा गुन्हा दाखल न झाल्यास राज्यातील पत्रकार रस्त्यावरील उतरतील असा इशारा दिला होता.या सगळ्याची दखल घेत राजापूर पोलिसांकडून आज बुधवारी सकाळी हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हे मूळचे राजापूर तालुक्यातील कशेळी येथील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहीण असा मोठा परिवार आहे.

पत्रकार शशिकांत वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत लिखाण करत होते. त्यांची शेवटची बातमी दि. ६ फेब्रुवारी, २०२३ च्या ‘महानगरी टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाली होती. आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो असल्याची ती बातमी होती. आणि त्याचदिवशी दुपारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.
रिफायनरी प्रस्तावित होऊ शकणार्‍या भागात जमिनींचे व्यवहार करणारा पंढरीनाथ आंबेरकर असं संशयित आरोपीचं नाव आहे. याच आंबेरकरने सोमवारी दु. १.०० वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर वारीशे यांना पाहिले. त्यानंतर बेसावध असलेल्या वारीशे यांच्या दुचाकीवर आपले वाहन चढवून त्यांची हत्या केली असा आरोप आहे.
रिफायनरी समर्थक संशयित पंढरीनाथ आंबेरकर त्यांच्या जीप वरती मागील बाजूस रिफायनरी समर्थक असं लिहिण्यात आल्याचं दिसत आहे. सोमवारी हा अपघात झाल्याचे कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली होती. त्यानंतर या सगळ्या प्रकरणी तपास करण्याचे आदेश धनंजय कुलकर्णी यांनी राजापूर पोलिसांना दिले होते. या अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या संशयित पंढरीनाथ आंबेडकर याला हातिवले येथून राजपूर पोलिसांच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आलं.
पत्रकार वारीशे यांना आधी रत्नागिरी येथे आणि नंतर बेशुद्धावस्थेत कोल्हापूर येथे तातडीने हलविण्यात आले. ते पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. मंगळवारी सकाळी ७.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वारीशे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे. अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. संबंधित आरोपीला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे. किंबहुना, अशी मागणी करणारे पत्र पत्रकार संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलं.
वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा यामध्ये मृत्यू होतो हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.



पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या नियोजनपूर्वक, सबळ पुरावे असल्याचा उदय सामंत यांचा दावा

रत्नागिरी - पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या आपघाती मृत्यूने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. संजय राऊत यांनी याप्रकरणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आरोप केला आहे. वारिसे प्रकरणात आरोपी पंढरीनाथ आंबेरकर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा समर्थक असल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय रंग आला आहे. याबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आली असून याप्रकरणी सबळ पुरावे असल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. 


पत्रकारांशी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रसारमाध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकाराने टीका केल्यास किंवा विरोधात लिहिल्यास हिंसा करण्याला परवानगी नाही. कोणाला असे वाटूही नये. ज्या व्यक्तीने हा गुन्हा केला आहे त्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला. आरोपीविरोधात ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. आरोपीने देखील गुन्हा कबूल केला असल्याचं पोलिसांनी सांगितल्याचे सामंत म्हणाले. 

पत्रकार वारिसे यांनी ज्याच्यादिवशी बातमी लिहिली त्याच्याच गाडीखाली त्याचदिवशी त्यांचा अपघातमी मृत्यू झाला. आरोपीने ही हत्या कशी केली, याबाबत पोलिसांना सांगितलं आहे. आरोपीने ही हत्या नियोजनपूर्वक केली आहे. ज्यांनी ही हत्या होताना प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी पुढे येऊन पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे. साक्षीदाराला घाबरण्याचे कारण नाही, प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला शिक्षा होईपर्यंत साक्षीदाराला पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

पत्रकाराच्या हत्येवरून सरकारवर आरोप होत असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post