बुद्धाची प्रेयसी ....यशोधरा आणि आजचं व्हॅलेंटाईन !


जगातल्या सगळ्या प्रेमकथा या प्रियकराला -प्रेयसीच्या मिलनावर आधारलेल्या आहेत. सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ जुलिएट,हिर-रांझा ,लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली. पण सिद्धार्थाची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावरच पाणी सोडलं ...तेही कायमच...यशोधरेचं इतकं उदात्त प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं.
-चित्ततोष खांडेकर,--------------------------------
व्हॅलेंटाईन्स विक सध्या सुरू आहे. प्रेमाचा उत्सव भरात आहे. कुठे गुलाब दिले जात आहेत. कुठे प्रपोजची धमाल आहे.तर कुठे मित्र मैत्रिणी रूंजी घालत आहे. खरं तर व्हॅलेटाइन्स हा पाश्चात्यांचा सण म्हणून हिणवला जातो. ही आपली संस्कृती नाही म्हणून नाकारला जातो. त्याच्या अंगविक्षेपांवर स्वघोषित संस्कृतीरक्षक टीका करतात. हे सगळं असलं तरी एक मात्र खरं! व्हॅलेनटाइन्स भारतातला सण नसेलही पण जगाला प्रेम शिकवलं भारतानेच.
रोमिओ जुलिएटच्याही हजार वर्ष आधी कालिदासाने शाकुंतल लिहून ठेवलं. दुष्यंत -शकुंतलेच्या या अप्रतिम प्रेमकथेला जर्मन साहित्यिकसुद्धा डोक्यावर घेतात. स्वर्ग आणि पृथ्वीचा सुंदर मिलाफ म्हणतात... वेद तर स्वर्ग आणि पृथ्वीचीच प्रेमकहाणी रंगवतात. भारतातलं प्रेम म्हणजे फक्त भेटवस्तू देऊन दिखावा नाही. .भारतातलं प्रेम म्हणजे प्रेम चॉकलेट देऊन ,गुलाब देऊन साजरं होईल इतकी तोकडी मर्यादित संकल्पना नाही...तर वर्षाचे 365 दिवसही साजरे केले तरी अपुरे पडतील इतकी उदात्त संकल्पना होती. प्रेमाकडे भारतात फक्त आसक्ती ,मिळवण्याची आशा म्हणून पाहिलं गेलंच नाही..तर प्रेम हे अध्यात्म आहे... प्रेम म्हणजे शांतता आहे... प्रेम म्हणजे त्याग आहे...दोन जणांपुरती राहील आणि त्यातच विरून जाईल त्यांच्यासोबत संपेल हे प्रेम हे कधीच भारतीयांना पटलंच नाही. म्हणून भारतातल्या प्रेमकथांकडे प्रेमासारखं पाहिलंच गेलं नाही. जनाबाईच विठ्ठलासाठी झुरणं, विठ्ठलासाठी रडणं, तुकारामांचं विठ्ठलासाठी तळमळणं या सगळ्या प्रेमकथाच आहेत....पण विठ्ठलला आम्ही देवत्वाच्या चौकटीत बंदिस्त केलं आणि त्यातल्या प्रेमभावना संपवल्या..
अशीच एक प्रेमकथा जी कधीच चर्चिली जात नाही. जी कधीच बोलली जात नाही..ती आहे यशोधरा आणि बुद्धाची.. बुद्ध म्हणजे शांतता. ..बुद्ध म्हणजे प्रेम ...बुद्धाने सांगितली तीच जगण्याची युक्ती बुद्धाचा मार्ग..हीच खरी मु्क्ती... डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही बुद्धच आपलासा केला...बाहेरचे विझणारे दिवे पाहून विजण्यापेक्षा आपल्यातला विवेकाचा दिवा प्रज्वलित करायला बुद्धाने शिकवलं. पण बुद्ध बुद्ध होण्याआधी एक शाक्त कुलातला एक राजकुमार होता. जगासाठी कणव वाटणारा, दु:ख पाहून तळमळणारा, हिंसेमुळे आहत होणारा एक दयाळू राजकुमार होता. सिद्धार्थ होता.
शाक्य कुलाचं राज्य हे लोकशाही पद्धतीचं राज्य होतं. शाक्यांमध्ये जन्मावरून राजा ठरत नसे तर शाक्यांचा संघ कोण राजा होईल आणि कोण होणार नाही हे ठरवत असे. या संघाची तुलना आजच्या भारताच्या संसदेशी करता येईल. त्याचप्रकारे या संघात चर्चा होतं. निर्णय घेतले जात होते. शाक्य कुलातले अनेक राजकुमार या संघात सहभागी होऊ इच्छित होते. पण त्यांच्यामधील सिद्धार्थ त्या सगळ्यांहून वेगळा होता. सगळ्यांना प्राण्यांची शिकार करण्यात आपला पुरूषार्थ वाटायचा तर सिद्धार्थाला प्राण्यांचे प्राण वाचवणे हाच खरा पुरूषार्थ वाटायचा. जो मारतो तो पुरूष नसतो तर जो वाचवतो तो पुरूष असतो. तरूण मुलं घोळक्याने फिरायला जायचे शिकार करत भटकायचे सिद्धार्थ मात्र संतांसोबत जगाचा विचार करणाऱ्या विचारवंतांसोबत राहायचा त्यांच्यासोबत चर्चा करायचा जगाची चिंता त्याला होती. माणसांच्या घोळक्यात राहून एकामेकाला शिव्या देणे, चढाओढ करणे आपण कसे श्रेष्ठ हे दाखवणं कधी सिद्धार्थाच्या गावीच नव्हतं.
सिद्धार्थ सर्वच अर्थांनी वेगळा होता.सिद्धार्थ झाला तर चक्रवर्ती सम्राट होईल नाहीतर एक महान संत म्हणजेच बुद्ध होईल अशी भविष्यवाणी त्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी केली होती.
सिद्धार्थाचं जगासाठी तळमळणं , माणसांची काळजी वाटणं, मनातला करूणाभाव या साऱ्याने एक तरूणी पुरती भारावून गेली होती. लग्नात वरण्याआधी तिनं कधीच त्याला मनात वरलं होतं. ती सिद्धार्थाच्या प्रेमात पडली होती. शाक्यांमधले एक सन्माननीय शाक्य म्हणजे दंडपाणी...त्या दंडपाणींची मुलगी म्हणजेच ही यशोधरा! लग्न करणार तर फक्त सिद्धार्थशी हे तिने कधीच मनात ठरवलं होतं. ..ती खऱ्या अर्थाने बुद्धाची प्रेयसी होती.
यशोधरा राधा जशी कृष्णामागे रानोमाळ भटकली तशी सिद्धार्थामागे रानोमाळ भटकली नाही. मीरेसारखं जळी स्थळी काष्ठी सिद्धार्थाला तिने शोधलं नाही. ना जुलिएट ,हीरसारखी तिने सिद्धार्थासाठी प्रेमाच्या विराण्या रचल्या. यशोधरेने सिद्धार्थाला माणूस म्हणून स्विकारलं होतं. त्याचं वेगळेपण आपलसं केलं होतं.
त्याकाळी स्वयंवराची पद्धत अस्तित्वात होती. राजकुलातली स्त्रीयांना आलेल्या स्वयंवरातून आलेल्या राजकुमार , सरदार पुत्रांमधून आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार होता. त्या प्रथेप्रमाणे यशोधरेचे वडील दंडपाणी यांनी तिचं स्वयंवर ठरवलं. तेव्हा स्वयंवराला सिद्धार्थाला बोलावणार का असा प्रश्न तिने वडिलांना विचारला. तर सिद्धार्थ एकटा राहतो, संत विद्वानांसोबत जगतो असा अवलिया कधीही घर सोडून जाऊ शकतो ही भीती दंडपाणींनी व्यक्त केली. सिद्धार्थाची सोबत यशोधरेला आवडेल का ? तो इतर तरूणांसारखा तिच्यावर कौतूकांचा वर्षाव करणारा नव्हता,जगण्याचा छोट्या छोट्या आसक्तीमध्ये अडकणारा नव्हता ,त्यामुळे त्याला बोलवू नये अशी त्यांची इच्छा होती.. पण यशोधरेने त्यांना विरोध केला. संतांसोबत राहणं हा काय गुन्हा आहे का? असं विचारलं. अखेर दंडपाणी यशोधरेसमोर झुकले आणि स्वयंवराला सिद्धार्थाला बोलावलं गेलं. अर्थातच यशोधरेने सिद्धार्थाला निवडलं. अनेक राजकुमारांचे डोळे पाणावले. अनेकांचा भ्रमनिरास झाला.पण सिद्धार्थाचे वडील शुद्धोधन मात्र खूश होते. त्या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं.
यशोधरेने एक पत्नी म्हणून नेटका संसार केला. पण यशोधरा ही सहचारिणी नव्हतीच कधी ती खरं तर प्रेयसीच होती. आता बायको प्रेम करते की नाही यावरून वाद होतीलही पण यशोधरा पहिले प्रेयसी होती आणि मग पत्नी होती. ती सिद्धार्थाच्या प्रत्येक भूमिकेत त्याच्यासोबत होती. त्यांना राहुल नावाचा मुलगाही झाला.

पुढे रोहिणी नदीच्या पाण्याच्या वापरावरून शाक्य आणि त्यांच्या शेजारी असलेल्या कोलियांमध्ये वाद निर्माण झाला. तेव्हा हा प्रश्न कसा हाताळावा याचा वाद शाक्यांच्या संघात आला. सारा संघ कोलियांशी युद्ध करावं आणि रोहिणी नदीच्या पाण्यावर हक्क मिळवावा या मतावर ठाम होता. पण सिद्धार्थ मात्र युद्धाच्या विरोधात होता. युद्धाने होणारी अमाप हिंसा त्याला अमान्य होती. आज जातीजातींमधला प्रचंड हिंसाचार पाहता बुद्धाच्या युद्धविरोधी भूमिकेची गरज खरंच अधोरेखित होते.

पण संघाच्या विरोधी भूमिका घेतली म्हणून तो आजच्या भाषेत म्हणायचं तर 'एन्टी नेशनल' ठरला. संघाच्या विरोधी भूमिका घेतली म्हणून परिव्राजक ( भटका) होण्याची ,राज्य सोडून जाण्याची शिक्षा सिद्धार्थाला मिळाली.
सिद्धार्थाने ती हसत हसत स्विकारली...पण एक संधी म्हणून...त्याला जगाच्या मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. शाक्यांच्या राज्यात राहून ते शक्य नव्हतं. जगाच्या समस्यांचं कारण शोधायचं होतं. खरतर यशोधऱा बुद्धाची पत्नी होती.जशी सीता रामासोबत वनवासाला गेली तशी तिही सिद्धार्थासोबत जाऊ शकली असती.पतीशिवाय तिचं आयुष्य कसं होईल हा विचारही तिच्या डोक्यात डोकावला असेल. पण ती गेली नाही. कारण इथे यशोधरेतली प्रेयसी जागी झाली. सिद्धार्थाची जगासाठी असलेली तळमळ त्याने तिला बोलून दाखवली होती. त्यामुळे आपण त्याच्यासोबत गेलो तर तिला हवं ते सुख मिळेल ही पण सिद्धार्थाची इच्छा पूर्ण होणार नाही. सिद्धार्थाला जगाच्या सगळ्यांच्या दु:खावर औषध शोधायचं होतं. मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. यशोधरा ही त्याचा मार्गातील अडचण झाली असती. तिने त्याला संसारात अडकवलं असतं.

सिद्धार्थाचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तिने स्वत:च्या संसारसुखावर पाणी सोडलं. हा त्याग म्हणजे खरं प्रेम असतं. जगातल्या सगळ्या प्रेमकथा या प्रियकराला -प्रेयसीच्या मिलनावर आधारलेल्या आहेत. सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ जुलिएट,हिर-रांझा ,लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली. पण सिद्धार्थाची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावरच पाणी सोडलं ...तेही कायमच...यशोधरेचं इतकं उदात्त प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं. सिद्धार्थ राज्य सोडून गेला. पुढे शाक्य कोलियांमधला वाद मिटला. सिद्धार्थाला परत बोलवायला काही हरकत नाही असं शाक्यांमधले ज्येष्ठ बोलू लागले. फक्त यशोधराच त्याला बोलवू शकत होती. पण तिने कधीच परत बोलवायचा प्रयत्न केला नाही. कारण सिद्धार्थाच्या मार्गात तिला अडसर व्हायचं नव्हतं. नंतर तिने दुसरं लग्नही केलं नाही. तर राहुलला..त्यांच्यो मुलाला वाढवण्यात आणि म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची काळजी घेणं योग्य समजलं.

आणि त्यातही रानावनात सिद्धार्थ जसा जगत असेल तशी यशोधरा महालात जगत होती. तिने महालातल्या सगळ्या सुखसोयी नाकारल्या. जमिनीवरच झोपू लागली. सीता वनात गेल्यावर रामही असं जगत होता. पण समाजाच्या बंधनांसाठी रामाने सीतेला सोडलं होतं. यशोधरेचं तसं नव्हतं. तिने सिद्धार्थाच्या स्वप्नांसाठी त्याच्या ध्येयाखातर हा मार्ग स्विकारला होता. म्हणून ती त्याची पत्नी होण्यापेक्षाही प्रेयसी म्हणून श्रेष्ठ ठरते .

पुढे सिद्धार्थाचा बुद्ध झाला. जगाच्या मुक्तीचा मार्गही त्याने शोधला. शांततेचा मार्ग शिकवणारा बुद्ध अखेर आपल्या मायदेशी परत आला. तेव्हा अख्खं कपिलवस्तू त्याला भेटण्यासाठी मरत होतं. बुद्धाला भेटायला ही झुंबड उसळली. पण यशोधरा मात्र आपल्या कक्षातच बसली..ती त्यांना जाऊन भेटली नाही. आपला प्रियकर आपल्याला येऊन भेटेल याची वाट ती पाहत राहिली. आणि सारं जग ज्याला भेटण्यासाठी तळमळत होतं...ते बुद्ध स्वत: यशोधरेला येऊन भेटले. ती ढसाढसा रडली. वर्षानुवर्ष मनात साठवून ठेवलेलं प्रेम अश्रूंच्या वाटे तिने मोकळं केलं. तिची तळमळ तिचा त्याग तिचं झुरणं वाया गेलं नव्हतं. तिच्या या त्यागामुळेच जगाला बुद्ध मिळाला होता. त्याच्या आशांसाठी तिने स्वत:च्या हक्काचा आकांक्षांचा साऱ्याचाच त्याग केला होता....यापलीकडे प्रेम काय असतं. समोरच्यासाठी सर्वस्व देणं हेच तर प्रेम असतं.
-०-

Post a Comment

Previous Post Next Post