वाघाच्या हल्ल्यात दोन बैल ठार



घोट वनपरिक्षेत्रातील मोडेमुधोली येथील घटना

गडचिरोली, ब्युरो आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या घोट वनपरिक्षेत्रातील मक्केपल्ली उपक्षेत्रातील माडेमुधोली येथे वाघाने हल्ला चढवून दोन बैलांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून वनविभागाने सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार माडेमुधोली येथील मंगरु चैतू नरोटे यांनी नेहमीप्रमाणे आपले बैल चारण्यासाठी जंगलात सोडले होते. सदर बैल गावालगतच्या जंगलात चराई करीत असताना सायंकाळच्या सुमारास

वाघाने दोन्ही बैलांवर हल्ला चढवून त्यांना ठार केले. यात पशुमालक मंगरु नरोटे यांचे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच मक्केपल्ली उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक प्रदीप घुटे व वनरक्षक कमलाकर चौधरी यांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.

घटनास्थळापासून जवळच वाघाचे पंजे आढळून आले आहेत. वनविभागाने वाघाचे या परिसरात अस्तित्व कायम असल्याची शक्यता व्यक्त करीत नागरिकांनी जंगलात जाण्याचे टाळून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post