प्रभारी पोलिस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप





 गडचिरोली:  तालुक्यातील पोटेगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी गोडसे यांनी दारू विक्रीच्या संशयावरून आपल्याला मारहाण केली, असा आरोप पोटेगाव येथील माया मंगेश मडावी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबतची तक्रार एसपी व गडचिरोलीचे ठाणेदार यांच्याकडे केली आहे.

नोटीस देऊन १० फेब्रुवारी रोजी गावातील संशयित दारू विक्रेत्यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलविले होते. त्यानुसार मी व माझे पती पोलिस स्टेशनमध्ये गेले. पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ५ लिटर मोहफुलांची दारू आढळून आली, असा मजकूर

लिहिलेल्या कागदावर गोडसे यांनी स्वाक्षरी करण्यास सांगितले. आपण वर्षभरापासून दारूचा व्यवसाय सोडला असल्याने स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यावेळी गोडसे यांनी मला व माझ्या पतीला मारहाण केली, तसेच शिवीगाळ केली, असा आरोप मडावी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

याबाबत प्रभारी अधिकारी गोडसे यांना विचारणा केली असता, माया मडावी या दारू विकतात. त्यांच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्या पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना शिवीगाळ किंवा मारहाण करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया गोडसे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post