पत्रकार चिरडला गुन्हेगाराने !



राजापूर येथे शशीकांत वारिसे यांना एका गुन्हेगाराने चिरडले.म्हणजे आता हेच गुन्हेगार चौथा स्तंभ चिरडून काढत आहेत.ज्या पत्रकारांनी त्या गुन्हेगाराला प्रसिद्ध केले.मोठे केले.नेता केले.असे करतांना आम्ही पत्रकार बांधवांना सावध करीत असतो.पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.आज तरी त्यांनी विचार केला आणि गुन्हेगाराला टाळले तरीही पुरेसे आहे.पुन्हा हा राक्षस किंवा असा कोणी दुसरा राक्षस मोठा होऊ नये.चार साधूंनी एक मृत सिंह जिवंत केला.आणि त्यांचं सिंहाने त्या चौघांना खाल्ले.ही रूपक कथा येथे लागू होत आहे. निमीत्त सुद्धा फालतूच.म्हणे आम्ही सिंह जिवंत करू शकतो.तितकी शक्ती आमच्यात आहे. हो .आहे शक्ती!पण सिंहाला का जिवंत करतात? माणसाला का नाही?मी रोज विचारतो. हा प्रश्न तथाकथित पत्रकार बांधवाना कधीच पडत नाही.स्पर्श करीत नाही.यातील खोट सुद्धा आता लपून राहिलेली नाही.
    माझा अनुभव आहे .मी जळगाव महापालिका निवडणुक लढलो.माझ्या विरोधात कनव्हिक्टेड क्रीमीनल होता.कोणी हिंमत करीत नव्हते म्हणून कांग्रेस ने मला ऑफर केली.काका, तुम्ही हिंमत करू शकता.मी केली.मला आर्थिक खर्च ही पुरवला.पण मी मतदारांना आठाणा देणार नाही,या कंडीशन वर.तरीही ,म्हणे चालेल.मी केली हिंमत.दहा दिवस मी प्रत्येक गल्लीत महानगरपालिका व त्याची कर्तव्ये, नगरसेवकाची जबाबदारी,त्याची गुणवत्ता, शहरातील समस्या यांची सांगड घालून भाषणे केलीत.अक्षरश: श्रोत्यांनी रस्ते ब्लॉक झालेत.पोलिसांनी व्हिडिओ शुटींग केली.म्हणाले सुद्धा, सर्वाधिक अभ्यासक आणि नियमांचे पालन करणारा माणूस.विरोधी उमेदवाराने सुद्धा कौतुक केले.काका,हे आम्हाला जमले नाही.तुम्हाला जमले.पण सत्य आणि आश्चर्य हेच कि, जळगाव मधील सतरा पेपर पैकी एकानेही माझी बातमी छापली नाही.फोटो तर दुरच ,पण साधा नामोल्लेख सुद्धा केला नाही.मी जवळीक असलेल्या, नातेवाईक असलेल्या पत्रकारांना विचारले तर नांव न सांगण्याच्या अटीवर कबूल केले कि, प्रत्येक पत्राला समोरच्या उमेदवाराने बातमी साठी एक लाख आणि तुमची बातमी न छापण्यासाठी पन्नास हजार दिले आहेत.आम्ही जरी तुमची बातमी घेतली,बनवली तरीही आमचे संपादक छापत नाहीत.का?म्हणे तसा करार झाला आहे.जर आम्ही अति उत्साहाने तशी कानाकोपऱ्यात छापली तर आम्हाला डच्चू देण्यात येईल.काका,पोटा पाण्याचा प्रश्न आहे.येथेच पत्रकार हारला होता.नव्हे मारला गेला होता.तो शिल्लक राहिलाच नाही.जे होते ,ते होते पत्रकाराचे रोबोट.
     अशी हिंमत नंदुरबार येथील गावकरी चे उपसंपादक दिनेश मोरे यांनी दाखवली होती.मंत्री विजय गावीत यांच्या भ्रष्टाचाराची बातमी छापली होती.म्हणून गावीत यांनी संपादकाला फोन केला.यापुढे वाढदिवसाचे तीस हजार मिळणार नाहीत. संपादकांनी मोरेंना उपसंपादक पदावरून टायपिस्ट पदावर फेकले.सापसिडी सारखे एकदम खाली घसरले.ही घटना इतर पत्रकारांनी मनावर कोरून ठेवली.पैसा मिळाला तर दाऊद ला सुद्धा महात्मा, धर्मात्मा, देशभक्त बनवावे लागते.मजबुरी आहे आमची. स्वताचे कौतुक करण्यापुरता चौथा स्तंभ म्हणवून घेतो.
     जळगाव मधे मंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य शिबीर भरवले.अर्थात आरोग्य मंत्री किंवा वैद्यकीय शिक्षणमंत्री असतांनाच खाजगी आरोग्य शिबीर भरवणे तद्दन चुकीचे आहे.नागरिकांना वाटले पण पत्रकारांना नाही वाटले.मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे होते.क्षणभर मान्य करू कि, फडणवीस गुंड नाहीत.फडणवीस गुन्हेगार नाहीत.पण त्यांचा सत्कार महाजन यांनी येथे शिबीरात अस्सल गुंन्हेगारांकडून करवून घेतला.जे त्या काळात हद्दपारीची शिक्षा भोगत होते.किती हा कोडगेपणा?किती हा नालायकपणा? फडणवीस यांचा समज झाला असावा कि,हिच दोन माणसे जळगाव शहरातील सर्वाधिक साधू संत असावीत.आश्चर्य ,याच फडणवीस कडे गृहखाते होते.मला वाटते , कलेक्टर आणि एसपींनी तशी गोपनीय माहिती दिली असावीच.पण सत्तेचा माज कलेक्टर किंवा एसपी ला किडा मकोडा समजतो.मी सोशल मेडिया मधून या घटनेचा तिरस्कार केला.सर्वच पेपरने मोठमोठे फोटो त्या स्वागताचे छापून आणले.फक्त महाराष्ट्र टाइम्स या पेपरने या घटनेचा तिरस्कार केला होता.फडणवीस व महाजन यांनी यांची दखल घेतली.महिन्याभरातच महाराष्ट्र टाइम्स ची जळगाव आवृत्ती बंद पडली.किती मोठा भयंकर बदल एका सत्य बातमीने महाराष्ट्र टाइम्स या पेपर वर झाला? बातमी छापणाऱ्या चौधरींची काय अवस्था झाली असेल? ते सुद्धा सापसीडीसारखे जमीनीवर कोसळले. 
    या दोन घटनांवरून निष्कर्ष काढता येईल का,माध्यम आता लोकशाही चा स्तंभ राहिला नाही.प्रसार माध्यमांना आता प्रायव्हेट इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त झाला आहे.त्यांनीच तो महत्प्रयासाने कायदेशीर मिळवून घेतला आहे.
     मी जेथे जमीनीवर आहे,जो अनुभव घेतला,जेथे साक्षीदार आहे,तेच लिहीतो.कवी,कविता, कल्पना, निबंध , कादंबरी ,नाटक लिहीत नाही.म्हणून स्पष्ट आणि उघड बोलतो,लिहीतो.बातमीदार,पत्रकार एकांतात कबुली देतात.पण उघड बोलू शकत नाहीत.उघड लिहू शकत नाहीत.
     जळगाव मधील गुन्हेगार धनसंपन्न आहेत.ते काहीही, कोणालाही विकत घेऊ शकतात‌.कलेक्टर,एसपी सुद्धा.तेथे बातमीवर आणि पत्रकार तर खूपच स्वस्त मिळतो.म्हणून पेपरमधे गुंड, गुन्हेगारांची बातमी सुद्धा त्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी छापावी लागते.
    जळगाव शहरातील अनेक नगरसेवक, महापौर, आमदार धुळे जेलमध्ये होते.तरीही त्यांचे पानभर ,हातभर फोटो पेपरला छापून येत असत.धुळे जेलमधून पैरोल वर किंवा जामीनवर सुटलेल्या आरोपींचे स्वागत एरंडोल पासून सुरू झाले.सुरत नागपूर हायवे एरंडोल ते जळगाव ब्लॉक झाला होता.हे मी गर्दीत जाऊन पाहिले नाही तर दुसऱ्या दिवशी पेपर मधे वाचले.आत्ताच एक म्होरक्या आरोपी जळगाव रेल्वे स्टेशन वर उतरला तर पुलाखाली फोटो ग्राफर लपलेले होते. फोटो काढण्यासाठी.कुणी चपलांचा शॉट घेतला.कुणी पायाच्या अंगठ्याचा.कुणी चड्डीचा.कुणी हाताचा.कुणी सदऱ्याचा.कुणी बटणांचा.कुणी पेन चा.कुणी कपाळावरील टिळ्याचा.काहींनी तर ओठांचा.दातांचा .माध्यमांनी स्पेशल स्क्वॉड बनवले होते.बातमी कव्हर करण्यासाठी.दुसऱ्या दिवशी पेपरला एकच बातमी.दादा, जळगाव ला तुमची गरज आहे.खूप आठवण येत होती.तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही.पून्हा या, पुन्हा या.हे वेगळे आणि फडणवीस यांचे मी पुन्हा येईन वेगळे.
     आम्ही भ्रष्टाचार, अपहार, गुंडगिरी, गुन्हेगारीला इतके जवळून स्विकारले आहे कि,ते आता पत्रकारितेचे अभिन्न अंग झालेले आहे.त्यात कोणा सज्जनासाठी ,विधायक बातमी साठी जागा ठेवलीच नाही.आणि म्हणून जळगाव शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्रोफेसर , साहित्यिक , विचारवंत यांनी विकत घेऊन पेपर वाचणे बंद केले आहे ‌.खप कमी झाला आहे.हेच सत्य मी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकार बांधवासमोर मांडले होते.मला सुचना मिळाली कि,जो माध्यमा विरोधात गेला,तो कायमचा अंधारात गेला.मी मान्य करतो.माध्यम मोठी शक्ती आहे.तरीही सत्यावर प्रकाशझोत टाकण्याचे धाडस करतोच.माझा जन्म अंधारातच झाला आहे.सकाळी चार वाजता.अर्धे जिवन अंधारातच गेले आहे.मृत्यू सुद्धा अंधारातच होणार आहे, गोळ्या लागून.अंत्यविधीनंतर अंधारातच जाणार आहे.ही जाण असल्याने अंधाराची भीती उरली नाहीच.प्रकाश साथ देत नसेल तर अंधार हाच सखा.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post