दोन तलाठी, एक मंडळ अधिकारी निलंबित , अवैध गौण खनिजाला पाठबळ देणे भोवले





महागाव : रेतीच्या अवैध वाहतुकीला पाठबळ दिल्यामुळे तालुक्यातील फुलसावंगी आणि टेंभी येथील दोन तलाठी आणि एक मंडळ अधिकारी यांना उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी शुक्रवारी दुपारी तडकाफडकी निलंबित केले. या कार्यवाहीमुळे गौण खनिजाच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याबाबत 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी १ फेब्रुवारीला रात्री २ वाजता फुलसावंगी आणि टेंभी येथे धाड मारून रेतीसाठा जप्त केला. तलाठी, मंडळाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

नोटिसीवर दाखल केलेले उत्तर समाधानकारक नसल्यामुळे डॉ. राठोड यांनी शुक्रवारी फुलसावंगीचे तलाठी आय. जी. चव्हाण, टेंभीचे तलाठी डी. बी. चव्हाण, मंडळ अधिकारी पी. बी. कांबळे यांना निलंबित केले. या कारवाईमुळे महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


फुलसावंगी, टेंभी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी धाड मारून रेतीसाठा जप्त केला. त्या अनुषंगाने तलाठी, मंडळ अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचे समाधानकारक उत्तर आले नाही. त्यामुळे त्यांना निलंबित केले. गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला पाठबळ देणाऱ्यांची गय करणार नाही.

- डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी, उमरखेड



Post a Comment

Previous Post Next Post