BJP आमदारपुत्राच्या घरी सापडले तब्बल ६ कोटींचे घबाड


४० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बंगळुरू, : . कर्नाटकमध्ये लोकायुक्तांनी भाजपाचे आमदार मदल वीरुपक्षप्पा यांचे सुपुत्र प्रशांत कुमार यांना ४० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तपास अधिकाऱ्यांनी प्रशांत यांच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांच्या घरात ६ कोटी रुपयांची कॅश मिळाली. यंदा कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षांच्या हाती यामुळे एक आयता मुद्दा सापडला आहे. लोकायुक्तांच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने प्रशांत यांच्या घरातून रोख रक्कम जप्त केली आहे. गुरुवारी रात्री ही छापेमारी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत छापेमारी सुरू होती.


अध्यक्षपदाचा राजीनामा

या कारवाईनंतर दावणगेरे जिल्ह्यामधील चन्नागिरीचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी राज्य सरकारच्या मालकीच्या 'कर्नाटक सोप अॅण्ड डिटर्जंट लिमिटेड' (केएसडीएल) या कंपनीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये मदल वीरुपक्षप्पा यांनी माझ्या कुटुंबियांविरोधात कट रचला जात आहे. मी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देत आहे कारण माझ्याविरोधातही आरोप करण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. केएसडीएल ही कंपनीच जगप्रसिद्ध मैसूर सॅण्डल हा साबण बनवते.



५ जणांना अटक

कर्नाटकमधील लोकायुक्त कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार २००८ च्या बॅचचे कर्नाटक प्रशासकीय सेवेचे अधिकारी प्रशांत मदल यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाली होती. यामध्ये सावण आणि डिटर्जंट बनवण्यासाठी कच्चा माल विकत घेण्याच्या व्यवहारासाठी एका ठेकेदाराकडून प्रशांत मदल हे ८१ लाखांची लाच मागितल्याचे म्हटले होते. याच तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने केएसडीएलच्या ऑफिसवर छापा टाकला. कर्नाटकचे लोकायुक्त बी. एस. पाटील म्हणाले की, जेव्हा लोकायुक्त पोलिसांनी केएसडीएल कार्यालयावर छापा मारला तेव्हा त्यांना तिथे २.२ कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यांनी प्रशांत यांच्या घरावर छापा मारला असता ६.१० कोटी रुपये जप्त केले. या प्रकरणामध्ये ५ जणांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








Post a Comment

Previous Post Next Post