पोलिस कर्मचारी कोंबड्यांची झुंज लावत असतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल अन्


लाखांदूर : राज्यात बंदी असलेल्या कोंबड्याच्या झुंजीला प्रोत्साहन देणे आणि झुंज लावणे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले. तीन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.


पोलिस कर्मचारी कोंबड्यांची झुंज लावत असतानाचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, कारवाई करायला गेलेल्या लाखांदूर पोलिसांना कोंबड्यांची झुंज बघण्याच्या मोह झाला. पण हा मोह त्यांना चांगलाच महागात पडला आहे. झुंज बघण्याच्या व्हिडिओ काल वायरल झाल्यावर ‘सरकारनामा’ने ‘स्वतः पोलिसच भरवतात कोंबड बाजार, अन् तेसुद्धा चक्क फडणवीसांच्या जिल्ह्यात!’ हे वृत्त दिले होते.



सरकारनामाच्या वृत्ताची दखल भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी घेतली. बदली करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये लाखांदूर बीट जमादार वकेकर, बीट जमादार भोयर व एएसआय नैताम यांच्या समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू झाली आहे. साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे पोलिस अधीक्षक मतानी यांनी सांगितले. त्यांच्या चौकशीत काय निष्पन्न होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एक पोलिस (Police) कर्मचारी स्वतः कोंबड्यांची झुंज लावताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर इतर ३ पोलिस कर्मचारी ही कोंबड्यांची झुंज पाहण्यात दंग झालेले दिसतात. काल हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भंडारा (Bhandara) पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पण अवैध व्यावसायिकांचे कर्दनकाळ ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी या पोलिस कर्मचाऱ्यांवर तातडीने बदलीची कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post