विद्यार्थ्यांवर मधमाशांनी केला जोरदार हल्ला



चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेलोरा या परीक्षा केंद्रावर (केंद्र क्रमांक ०२४७) प्रवेशद्वाराजवळ मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले. ही घटना सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आले.
उच्च माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षेचे पेपर सर्वत्र सुरू आहेत. त्या अनुषंगाने आज इयत्ता १२ वीचा रसायनशास्त्र व व्होकेशनल विषयाचा पेपर होता. ठीक ११.०० ते २.०० या कालावधीत पेपर सुरू असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी प्रवेश करत असताना प्रवेशद्वारा जवळच मधमाश्याने हल्ला चढवला त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. यात मधमाशांनी चावा घेतल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. यात सुरज भिमनकर व तेजस मुके हे गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. यात मोरेश्वर लांडे (शिक्षक) व दीपक उमरे हा विद्यार्थीही मधमाशांच्या हल्ल्यात सापडला. लगेच परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली.


उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कडोली येथे फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यात आले. यानंतर पेपरला नियमित वेळात सुरुवात करण्यात आले. पेलोरा येथील परीक्षा केंद्रावर एकूण ९६ विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी खोल्यांमध्ये जात असताना ही घटना घडली. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या नैसर्गिक घटनेत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना परीक्षेला उपस्थित होत आले नाही. या घटनेची माहिती केंद्रप्रमुख यांनी कस्टोडियन व बोर्डाला कळविली असल्याची माहिती केंद्रप्रमुख रामटेके यांनी दिले




Post a Comment

Previous Post Next Post