फेसबुकवरून ओळखी झालेल्या युवकाने १६ वर्षीय मुलीचे घरातून केले अपहरण


नागपूर : फेसबुकवरून ओळखी झालेल्या युवकाने १६ वर्षीय मुलीचे घरातून अपहरण केले. तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. तिची सोडवणूक करण्यासाठी घरी आलेल्या तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीयूष करण निलपाल (२१, लष्करीबाग, पाचपावली) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पीडित १६ वर्षीय मुलगी रिटा (काल्पनिक नाव) ही बाराव्या वर्गात शिकते. तिचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे. फेसबुकवर पीयूष निलपाल याची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. दोघांचीही फेसबुकवरून मैत्री झाली. दोघांच्याही भेटी-गाठी वाढल्या. यादरम्यान, पीयूषने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याच्या प्रेमात ती वेडी झाली. आईवडिल घरी नसताना पीयूष तिच्या भेटीला घरी आला. मात्र, काही कामानिमित्त वडिल घरी आल्यानंतर दोघेही घरात गप्पा करताना दिसले. विचारणा केली असता मित्र असल्याचे सांगून मुलीने वेळ मारून नेली. मात्र, तो वारंवार तिला भेटायला यायला लागल्याने आईवडिलांना दोघांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली. त्यामुळे पीयूषची समजूत घातली आणि त्याला मुलीच्या नादी न लागण्याची तंबी दिली. तसेच मुलीलाही चांगला मार दिला. दोघांची ताटातूट झाली.



मात्र, विरह सहन न झाल्याने पुन्हा दोघांच्या भेटी-गाठी सुरु झाल्या. आईवडिलांनी मुलीची समजूत घातली. मात्र, ती ऐकायला तयार नव्हती. ९ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता पीयूष हा प्रेयसीच्या घरी आला. त्याने तिला दुचाकीवरून पळवून नेले. तिला घरी डांबून ठेवले. तिचे आईवडील पीयूषच्या घरी गेले असता त्यांना पीयूषने जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलीलाही सोबत नेण्यास विरोध केला. आईवडिलांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून अपहरण आणि विनयभंग करण्यासह अन्य कलमान्वे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पीयूषने घरातून पळ काढला. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post