श्रीराम तत्व नित्य ही नूतन ही - विवेक कवठेकर* वणी :- परशुराम पोटे

वणी :- परशुराम पोटे

         जीवनात एखादी गोष्ट नित्याची झाली तर त्याचा कंटाळा येतो आणि मग माणूस नूतनाचा ध्यास घेतो. मात्र नित्य उपासनेचा विषय असून देखील श्रीराम तत्त्वाचा कधीच कंटाळा येत नाही कारण श्रीराम तत्व नित्य ही आहे आणि नूतन देखील. रामायण हे केवळ आदी काव्य नाही. ज्याला आदी आहे त्याला अंत निश्चित आहे. पण रामचरिताला अंत नसल्याने रामायण हे अनादि अनंत काव्य आहे. असे विचार सुप्रसिद्ध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक कवठेकर यांनी व्यक्त केले.
      कोरोना निर्बंधामुळे लांबलेल्या नगर वाचनालयातर्फे आयोजित विदर्भ साहित्य संघ वणी शाखेतर्फे प्रायोजित हेमंत व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प गुंफताना जैताई देवस्थानच्या चैत्र नवरात्र उत्सवात नित्यनूतन राम या विषयावर ते आपले विचार व्यक्त करीत होते.
   यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे, जैताई देवस्थानचे सचिव माधव सरपटवार उपस्थित होते.
      सकाळच्या वेळेला असणारे रामप्रहर हे नाव, राघववेळ ही लालित्यपूर्ण संज्ञा, एखाद्या गोष्टीतचं असल्यानंतर यात काही राम नाही हा वाक्प्रचार, मिठा सारख्या पदार्थाला रामरस म्हणण्याची प्रवृत्ती, अचूक गोष्टीसाठी रामबाण हा शब्दप्रयोग, तर आयुष्याच्या शेवटी राम म्हटले ही कथनी अशा स्वरूपात आपले संपूर्ण जीवन रामाने व्यापलेले आहे असे स्पष्ट करीत श्रीराम ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक प्रवृत्ती आहे हे कवठेकर यांनी  प्रतिपादन केले.
    रामायणावर आज पर्यंत असंख्य कवींनी आपल्या रचना केल्या पण त्यापैकी कोणतीही रचना एकमेकाची नक्कल वाटत नाही हे राम चरित्राचे वैभव आहे असे म्हणत दुष्टांच्या हाती सत्ता जाऊ नये यासाठी पुष्पक विमान कुबेराला परत करण्याची श्रीरामांची प्रवृत्ती, गूहक, शबरी, वानर यांच्याशी संधान साधत समरसता साधणारे श्रीराम अशा विविध रामपैलूंना त्यांनी उलगडून दाखविले.
      अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी श्रीरामांपूर्वींचे वाली, सहस्रार्जुन रावणाला मारू शकले नाही कारण तेही अहंकारी होते. श्रीरामांचा विजय हा अहंकारावर विनयाचा विजय आहे असे म्हणत श्री राम हे स्मरण आणि स्फुरणाचे धनी असल्याने ते पूजनीय आहेत असे श्री राम शेवाळकर यांच्या सत्कारातील वचनाच्या आधारे विशद केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव सरपटवार यांनी केले, आरंभी सौ प्रणिता पुंड आणि अपर्णा देशपांडे यांनी श्रीराम स्तवन आणि गुरु महात्म्य गीत सादर केले. त्यांना अमोल ससाने यांनी वाद्यसंगीत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी तर आभारप्रदर्शन अभिजित अणे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सौ. रेणुका अणे यांच्या पसायदानाने झाली.

Post a Comment

Previous Post Next Post