शाळेतील चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या आरोपावरून संतप्त पालकांनी शिक्षकाची केली... धुलाई

बीड : शहरातील एका शाळेतील चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या आरोपावरून संतप्त पालकांनी शिक्षकास चोप दिला. ही घटना ९ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. पोलिसांनी धाव घेतल्यानंतर पालक शांत झाले. या प्रकरणी विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षकावर गुन्हा नोंद झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शाहेदखान कासम पठाण (33, रा. नायगाव, ता. पाटोदा) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित १० वर्षीय मुलगी चौथीत शिक्षण घेते. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी मधल्या सुटीनंतर शाहेदखान पठाण हा अध्यापनासाठी वर्गात आला. यावेळी बाकड्यावर बसलेल्या पीडितेचा त्याने विनयभंग केला. वर्ग संपल्यावर बाहेर पडताना शिक्षक शाहेदखान याने पीडितेला कोणाला काहीही सांगू नको, असे बजावले. ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पीडितेच्या संतप्त नातेवाइकांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला.

त्यानंतर शिक्षक शाहेद खान यास त्यांनी लाथाबुक्क्यांनी चोप दिला त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक केतन राठोड वसहकाऱ्यांनी धाव घेत नातेवाइकांना शांत केले. त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून शाहेदखान पठाणविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पिंक पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक मीना तुपे करीत आहेत. सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असून, कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post