आदिवासी महिलेला जीभेनं शौचालय चाटून स्वच्छ करण्यास भाग पाडलं, भाजपाच्या निलंबित महिला नेत्याला अटक

झारखंड:- भाजपाच्या एका महिला नेत्यानं घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंर्तगत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता या भाजपा महिला नेत्याला अटक करण्यात आली आहे. सीमा पात्रा असं अटक करण्यात आलेल्या भाजपाच्या महिला नेत्याचं नाव आहे.

आरोपी सीमा पात्रा या झारखंडच्या रहिवासी आहेत. त्या माजी आयएसएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. सीमा पात्रा गेल्या आठ वर्षांपासून पीडित आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. सीमा पात्रा यांनी पीडित महिलेला आपल्या जीभेनं शौचालय चाटून स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपानंतर सीमा पात्रा यांची भाजपा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.


गरम तव्याचे दिले चटके, पीडितेचा आरोप

सीमा पात्रा यांच्या मुलीने सुनीता यांना १० वर्षांपूर्वी घरकामासाठी ठेवलं होते. मात्र, सीमा पात्रा या सुनीताला काठीने मारहाण करत. राग अनावर झाल्यावर गरम तव्याचे चटके आणि दात तोडल्याचा आरोपही सुनीताने लावला आहे. तसेच, जेवण न देता तिला खोलीमध्ये बंद देखील करण्यात येत असल्याचे सुनीताने सांगितलं.


सीमा पात्रांच्या मुलाने केली पीडितेची सुटका

आरोपी सीमा पात्रा यांचा मुलगा आयुष्मान यानं पीडित महिलेला वाचवलं आहे. त्यानेच सर्वप्रथम घरात घडणाऱ्या कृत्याची माहिती आपला मित्र विवेक बस्के याला दिली. त्यानंतर पीडितेनं तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती विवेक यास दिली. यानंतर आयुष्मानने विवेकच्या मदतीने पीडितेची सुटका केली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच रांचीतील अरगोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आता आरोपी सीमा पात्रा यांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post