रस्त्यावरून स्वस्तात सोने घेणे पडले महागात

महिलेची अडीच लाखांची फसवणूक

नागभीड : स्वस्त सोने देण्याचे आमिष दाखवून नागभीड येथील एका महिलेची अडीच लाखांची फसवणूक झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. यासंदर्भात नागभीड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावना प्रवीण अलमस्त असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला नागभीड येथील रहिवासी असून, तिचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. दोन अज्ञात व्यक्ती ४ सप्टेंबरला तिला कानपा येथील बाजारात भेटले आणि आमच्याकडे सोने असून, ते आम्हाला विकायचे आहे, असे सांगून तिला काही ऐवज दाखविला. पण तिने सोने घेण्याचे नाकारले. पण या व्यक्तींनी तिचा पिच्छा सोडला नाही. ते तिला परत उमरेड येथे भेटले. यावेळी महिला सोने घेण्यास तयार झाली. याबदल्यात त्यांनी तिच्याकडून २ लाख ५० हजार रुपये घेतले. काही दिवसांनी हे सोने बनावट असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच भावना अलमस्त यांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ४१७, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post