तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट, काही सैनिक जखमी झाल्याचं वृत्त



अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याचं वृत्त आहे.

ही घटना नेमकी कधी घडली हे स्पष्ट झालेलं नाही.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 डिसेंबरला म्हणजेच गेल्या शुक्रवारी हा संघर्ष झाला होता.
भारतातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'ने भारतीय संरक्षण अधिकार्‍यांच्या हवाल्याने लिहिलंय की, अरुणाचलमधील तवांग येथे झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांपेक्षा चिनी सैनिक जास्त प्रमाणात जखमी झाले आहेत.

15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर अशी ही पहिलीच घटना आहे.

त्यावेळी 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जखमी झाले होते.

'द ट्रिब्यून' या वृत्तपत्रानं लिहिलंय की, या भागात भारत आणि चीनचे सैनिक याआधीही आमनेसामने आले आहेत.

मात्र, या प्रकरणी भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पूर्व लडाखमध्ये ऑगस्ट 2020 नंतर दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये चकमक होण्याची ही पहिलीच घटना आहे.

चीननेही याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेलं नाहीये.

विरोधी पक्षांचा विरोधकांवर निशाणा
तवांगमध्ये चिनी सैनिकांशी झटापट झाल्याची बातमी आल्यानंतर काँग्रेसने भाजप सरकारवर तोफ डागायला सुरुवात केलीय. भाजपने चीनच्या प्रश्नावर डळमळीत भूमिका सोडून द्यावी, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

काँग्रेसने ट्वीट करत म्हटलं की, "अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त आहे. सरकारने आपली डळमळीत भूमिका सोडून चीनला कठोर भाषेत उत्तर दयायला हवं. चीनचा हे वागणं खपवून घेतलं जाणार नाही हे सांगायला हवं."
एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की, ‘संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना देखील सरकारने या चकमकीची बातमी इतके लपवून का ठेवली?’

त्यांनी पुढे लिहिलं की, "अरुणाचल प्रदेशातून ज्या बातम्या समोर येत आहेत त्या चिंताजनक आहेत. भारत -चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली, आणि सरकारने देशाला इतके दिवस अंधारात ठेवलं. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसदेत हे का सांगितलं नाही?"
त्यांनी म्हटलं की, या चकमकीची जी माहिती समोर येते आहे ती सुद्धा संदिग्ध आहे.

"ही चकमक होण्यामागे नेमकं कारण काय होतं? या चकमकीत गोळीबार झाला की गलवानसारखा प्रकार घडला? त्यांची स्थिती काय होती? किती सैनिक जखमी झाले? चीनला ठणकावून सांगण्यासाठी संसद आपल्या सैनिकांचे समर्थन करू शकत नाही का?" असे प्रश्न ओवैसी यांनी विचारले.

 

ते म्हणतात, "चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कर कधीही तयार आहे. मोदींच्या कमकुवत नेतृत्वामुळेच भारताला चीनसमोर अपमानित व्हावं लागलंय. संसदेत यावर चर्चा होण्याची गरज आहे. आणि मी उद्या संसदेत या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडणार आहे."

गलवानमध्ये काय घडलं होतं?
15 जून 2020 रोजी पूर्व लडाखमधील गलवान येथे भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला.

गलवानमध्ये चिनी सैनिकही मोठ्या प्रमाणात मारले गेल्याचा दावा भारतानं केला. मात्र चीनने केवळ चार सैनिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला होता.

फेब्रुवारी 2022मध्ये 'द क्लॅक्सन' या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं आपल्या एका बातमीत दावा केला होता की, गलवानमध्ये चार चिनी सैनिक नव्हे, तर त्याहून कितीतरी पट अधिक म्हणजे किमान 38 पीएलए सैनिकांचा मृत्यू झाला होता.

गलवान चकमकीमध्ये भाग घेतलेल्या कमांडरला चीननं यावर्षी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.
2020 मध्ये भारत आणि चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. 1 मे 2020 रोजी पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे डझनभर सैनिक जखमी झाले.

यानंतर 15 जून रोजी पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली.

या चकमकीबाबत 16 जून रोजी भारतीय लष्करानं वक्तव्य करत म्हटलं, "चकमकीच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले 17 सैनिक गंभीर जखमी झाल्यानं मरण पावले. या संघर्षात मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 20 झाली आहे."

चीननंही एक निवेदन जारी केलं. पण त्यांचे किती सैनिक मारले गेले, हे स्पष्ट झाले नाही. काही महिन्यांनंतर फेब्रुवारी 2021 मध्ये, चीनने गलवान चकमकीत मरण पावलेल्या आपल्या चार सैनिकांना मरणोत्तर पदकं जाहीर केली.
-०-

Post a Comment

Previous Post Next Post