कराल.. कराल निवडणुकीत प्रचार कराल पाटील साहेब..

भोर:- ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करणं एका पोलिस पाटलाला महागात पडलं आहे. निवडणूक प्रचारात सहभाग घेतल्यामुळे भोर तालुक्यातील अंगसुळे गावातील पोलिस पाटील भानुदास मारुती तावरे यांना एका महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी घेतला आहे.

अंगसुळे गावात कालच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत गावचे पोलिस पाटील भानुदास तावरे यांनी सहभाग घेतल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. दबडे यांनी या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना सादर केला.

पोलिस पाटील भानुदास तावरे यांनी गावातील श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता विकास पॅनलच्या प्रचारात सहभाग घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी त्यांचे एक महिन्यासाठी निलंबन केले आहे. पोलिस पाटील नियुक्तीपत्रातील शर्ती व अटींचा भंग करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे..

Post a Comment

Previous Post Next Post