धीरेंद्र शास्त्री खरंच लोकांच्या मनातलं ओळखतात का?


तुम्ही कदाचित विचार करत असाल की धीरेंद्र शास्त्री खरंच लोकांच्या मनातलं ओळखतात का? याचं वेगवेगळे लोक, वेगवेगळं उत्तर देतील.

धीरेंद्र शास्त्री म्हणतील – आम्ही काही करत नाही, सगळं बालाजी करतात आणि आमच्याकडून करून घेतात.


भक्त म्हणतील ते चमत्कार करतात.

विज्ञान, मनोवैज्ञानिक आणि जादुगरांना विचाराल तर तुम्हाला एकदम वेगळंच उत्तर मिळेल.

एक कला आहे ज्याच नावं आहे मेंटॅलिझम. याला सोप्या भाषेत समोरच्याच्या मनातलं ओळखणं असंही म्हणतात.

या कलेचा अभ्यास करणारी व्यक्ती समोरच्याचे हावभाव, शब्दांचा वापर, त्याची बोलण्याची पद्धत यावरून समोरच्याच्या मनात काय चालू आहे ते ओळखू शकतो.

मुंबईच्या यु-ट्यूबर सुहानी शहा या कलेचा अभ्यास करतात. त्या गेल्या काही दिवसात टीव्ही चॅनेल्सवरही दिसल्या.

सुहानी आपल्या यू-ट्यूब व्हीडिओत आणि शोमध्ये समोरच्याने काही न सांगता त्याच्याशी संबधित काही गोष्टी ओळखून दाखवते.

सुहानी शाह बीबीसीशी बोलताना म्हणतात, “जादूचे अनेक प्रकार असतात. त्यातलाच एक प्रकार मेंटॅलिझम आहे. मी 32 वर्षांची आहे आणि 7 वर्षांची असल्यापासून जादूचे खेळ करतेय. 10 वर्षांपासून मेंटॅलिझम करतेय. मेंटॅलिझममध्ये अनेक टेक्निक असतात. समोरच्याच्या डोळ्यांची मुव्हमेंट, हावभाव, बोलायची पद्धत, यावरून समोरच्याशी संबधित गोष्टी जाणून घेतल्या जाऊ शकतात.”

धीरेंद्र शास्त्रींचे कार्यक्रम आणि त्यातून लोकांचं भलं करण्याचा दावा यावर सुहानी शाह यांना आक्षेप आहे.
त्या म्हणतात, “सनातन धर्म म्हणतो की खरं बोललं पाहिजे. त्यामुळे जर कोणी खोटं बोलत असेल तर हे चूक आहे. हनुमान आपल्या सगळ्यांचे देव आहेत आणि आपल्या सर्वांवर त्यांची कृपा आहे पण धीरेंद्र जर कोणाच्या मनातलं देवाच्या कृपेने अचूक ओळखण्याचा दावा करत असतील तर हे चूक आहे. हा एक जादूचा खेळ आहे आणि याला खेळच म्हटलं पाहिजे. तुम्ही माझे व्हीडिओ पाहिले असतील तर धीरेंद्र करतात त्यापेक्षा कितीतरी पुढच्या गोष्टी आम्ही करतो हे कळेल. ज्याला आम्ही कला म्हणतो त्याला धीरेंद्र चमत्कार म्हणतात.”

यूपीएससी परीक्षांचे क्लासेस घेणारे प्राध्यापक डॉ. विकास दिव्यकीर्तिही आपल्या वर्गात लोकांच्या डोक्यात काय चाललं आहे ते ओळखण्याची कलेबद्दल म्हणतात, “मानसशास्त्रात अनेक लोक असे असतात की जे लोकांचे फक्त डोळे पाहून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे ओळखू शकतात.”

आम्ही सुहानीला विचारलं की त्या आम्हाला या खेळ कसा करायचा हे सांगू शकतील का? म्हणजे लोकांनाही कळेलआणि ते स्वतः हे करून पाहू शकतील.

सुहानी म्हणतात, “नाही, हे मी सांगू शकत नाही. कारण असं सांगितलं तर जादूच्या खेळांचं रहस्य सगळ्यांसमोर खुलं होईल. मीच नाही, जगभरात अनेक लोक ही कला शिकतात आणि हा खेळ करतात. मी तुम्हाला याचं रहस्य सांगून त्या कलाकारांवर अन्याय करू शकत नाही.”

अशा प्रकारचे चमत्कार करण्याचा दावा करणारे धीरेंद्र शास्त्री एकटेच नाहीयेत.

मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मात असे अनेक लोक आढळतात. कधी कुराणच्या आयत वाचून तर कधी ‘हालेलुया’ म्हणत लोकांची दुःख शमवण्याचा दावा करणारे अनेक लोक आहेत.

सोशल मीडियावर असे अनेक व्हीडिओही आहेत ज्यात विकलांगांना चालताना दाखवलं आहे, व्हीलचेअरमधून उठून पळताना दाखवलं आहे, अंधांची दृष्टी परत आल्याचा दावा आहे.

भारतातही मदर तेरेसा यांच्या कथित चमत्कारांवर लोकांनी प्रश्नचिन्ह लावलं आहे.

सन 2015 मध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की, “मदर तेरेसा यांनी लोकांची सेवा केली पण त्याचा उद्देश ज्यांची सेवा केली जातेय त्यांना ख्रिश्चन बनवण्याचा होता.”

नुकताच एक मल्याळम चित्रपट ‘ट्रान्स’ रिलीज झाला होता. या चित्रपटात येशू ख्रिस्ताच्या नावावर लोकांचा इलाज करणारे लोक, त्याचं साम्राज्य आणि त्याची काळी बाजू दाखवली गेली होती. आमीर खानचा ‘पीके’ हा चित्रपटही सर्व धर्मांचा बाजार मांडणाऱ्या लोकांना दर्शवत होता.

पडद्यावर असे चित्रपट, धर्माचा बाजार आणि त्यामागचं सत्य पुढे आणण्याचे प्रयत्न होत असतील, पण प्रत्यक्षात मात्र लोकांचा विश्वास अशा गुरू आणि बाबांवर वाढत चालला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post