माजी मंत्री बच्चू कडू अपघातामध्ये गंभीर जखमी


अमरावती :- मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत.

आज ( ११ जानेवारी ) सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post