तहसील कार्यालयात रेतीचे ढिगारे...


भंडारा :-
रेती चोरी संपुष्टात आणल्याचा दावा पोलिस प्रशासन करीत असला तरी भंडारा तहसील कार्यालयातील रेतीचे ढिगारे जिल्ह्यात रेतीची सर्रास चोरी सुरू असल्याची साक्ष देत आहेत. या रेतीमुळे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाकडे जाण्याचा मार्ग कसरतीचा बनला आहे. पर्यावरणाचे कारण देत भंडारा जिल्ह्यात मागील वर्षीपासून रेती घाटाचे लिलाव झाले नाहीत. परंतु, भंडारा लगतच्या नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील घाटांच्या रॉयल्टीवर भंडारा जिल्ह्यातील घाटांमधून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा करून तस्कर गब्बर होत असून यात त्यांना महसुल व पोलिसांचे अभय मिळत आहे.
………………………………………..

180 ब्रास रेतीसाठा..!
भंडारा तहसील कार्यालयाच्या आवारात सद्यःस्थितीत 1 ट्रक व 9 ट्रॅक्टर जमा असून मोकळ्या जागेवर 180 ब्रास रेती जमा आहे. याशिवाय कारवाईत पकडण्यात आलेली रेती 2 हजार ब्रासच्यावर आहे. या रेतीचा लिलाव करण्यात येणार असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


बांधकामाला रेतीपुरवठा..!!

यापूर्वी रेती चोरी पकडण्याची कारवाई मोठ्या प्रमाणावर होत नव्हती. परंतु, अलीकडे शासकीय कारवाईच्या नावावर रेती पकडण्याचे धाडसत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जिल्ह्यात महामार्ग बांधणीच्यावेळी असा प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबविला जातो. यात ही रेती मोठ्या कंत्राटदारांना कमी दरात देऊन हितसंबंध जपले जातात. यात महसूलचे बडे अधिकारी आपली भूमिका वठवित असतात.




घरकूल अर्ध्यावर…!!

महसूल विभाग एकीकडे रेती चोरी पकडत असताना दुसरीकडे घरकुलाची कामे प्रलंबित आहेत. पकडलेली रेती घरकुलांसाठी दिली, तर घरकुलाचे प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. परंतु, अधिका यांना घरकुलांपेक्षा मोठ्या कंत्राटदारांची काळजी अधिक असल्यामुळे घरकूल लाभार्थी वंचित असतात.

आम्हाला मोफत रेती द्या…!!!

महसूल विभागातर्फे घरकूल लाभार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन देण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु, त्यांना रेती उपलब्ध होत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहे. एकीकडे अपूर्ण घरकूल तातडीने पूर्ण करावे, यासाठी शासनाने अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे महागडी रेती विकत घेऊन घरकुलाचे बांधकाम करण्याची ताकद गरीब लाभार्थीची नाही. त्यांची आर्थिक कोंडी झाली. तर अर्धवट बांधकामामुळे त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आम्हाला तहसील प्रशासनाने जप्त केलेली रेती घरकुल बांधकामासाठी उपलब्ध करावी. अशी त्यांची मागणी आहे.



Post a Comment

Previous Post Next Post